spot_img
spot_img
spot_img

एस.बी.पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना एनडीए दीक्षांत समारंभास उपस्थित राहण्याची संधी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील नववीच्या २४८ विद्यार्थी व शिक्षकांना खडकवासला, पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) च्या १४९ व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

डेप्युटी कंमांडण्ट ऑफ एनडीए व मुख्य प्रशिक्षक एअर वाईस मार्शल सरताज बेदी, कंमांडण्ट ऑफ एनडीए वाईस ऍडमिरल अनिल जग्गी, एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, समन्वयक वंदना सांगळे, पृथा वैद्य, प्रशासकीय व्यवस्थापक मनीष ढेकळे, एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी व त्यांचे पालक आदी उपस्थित होते.

यावेळी पासिंग आउट परेडचे उत्कृष्ट सादरीकरण झाले. हे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या भावी अधिकाऱ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये युवतींची संख्या देखील उल्लेखनीय होती.
वाईस ऍडमिरल, कमांडण्ट ऑफ एनडीए अनिल जग्गी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच एनडीएची स्थापना करण्याची संकल्पना, यापूर्वी युद्ध भूमीवर देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अधिकारी व सैनिकांचे स्मरण केले.

उपस्थित विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा, उत्कृष्ट कॅडेट पुरस्कार समारंभ, ट्राय सर्व्हिस युनिटी, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स मधील सहकार्याचे प्रदर्शन, परेड मधील शिस्त, अचूकता आणि औपचारिक शपथविधी पाहण्याची संधी मिळाली. या समारंभानंतर कॅडेट्स हे सैन्यात अधिकारी बनतात आणि देशसेवेसाठी सज्ज होतात. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे विद्यार्थी व विद्यार्थिनी हे शिस्तबद्ध संचलन पाहून भारावून गेले. समारोप प्रसंगी सुखोई लढाऊ विमानांनी केलेल्या चित्तथरारक कसरती पाहून विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय सैन्याबद्दल जाज्वल्य अभिमान व आदर निर्माण झाला. शेवटी खेत्रपाल परेड मैदान, सुदान ब्लॉकची सुप्रसिद्ध इमारत,
कॅडेटचे वसतिगृह या ठिकाणी भेट देण्याची संधी मिळाली.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!