देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आश्वासन मोडले, बहुमोल भूखंड बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभा २०२४ च्या प्रचारादरम्यान वाकड ,कस्पटे वस्ती येथील ग्राउंडवर उपस्थित राहून स्थानिक नागरिकांना विकासाचे ठोस आश्वासन दिले होते. या ठिकाणी विरंगुळा केंद्र, खेळाचे मैदान, उद्यान हेही होणार होते . या बहुमुल्य भूखंडावर नागरिकांसाठी सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन देत जनतेचा विश्वास संपादित केला होता.
परंतु सत्ता मिळाल्यानंतर सरकारने आपला शब्द मोडत हा भूखंड थेट बिल्डरच्या हवाली केल्याचे निदर्शनास आले.कस्पटे वस्ती,वाकड परिसरात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याऐवजी खासगी गटांना लाभ देणारा हा निर्णय स्थानिक जनतेच्या भावनांवर आघात करणारा असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर कस्पटे वस्ती,वाकडमधील संतप्त नागरिकांनी आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निषेध आंदोलन सुरू केले आहे. नागरिकांची सामूहिक मागणी स्पष्ट आहे .हा भूखंड विक्रीचा निर्णय त्वरित रद्द करा आणि दिलेले आश्वासन पूर्ण करा!
स्थानिकांसाठी आरक्षित केलेली जागा बिल्डरच्या हवाली करण्याचा हा निर्णय अन्यायकारक असून, नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा आहे. हा निर्णय मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबवले जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.



