शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात अखेर ट्रेडमिल चाचणी (TMT) सेवा सुरू होणार आहे. या सुविधेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
याआधी थेरगाव रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे यासारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू असल्या तरी हृदयाच्या तपासणीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ट्रेडमिल चाचणी मात्र फक्त वायसीएम रुग्णालयातच उपलब्ध होती. त्यामुळे थेरगाव, काळेवाडी, रावेत, किवळे, मामुर्डी, चिखली परिसरातील हजारो रुग्णांना चाचणीसाठी वायसीएम गाठावे लागत होते.
या समस्येकडे लक्ष वेधत सायली नढे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर सातत्याने बैठकांमध्ये आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाठपुरावा केला. अखेर वैद्यकीय विभागाने तातडीने आवश्यक यंत्रणा बसवणार असून थेरगाव रुग्णालयात ‘टीएमटी’ चाचणी सुरू होणार आहे.
या यशाबद्दल बोलताना सायली नढे म्हणाल्या, “महिलांसह सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी हा लढा उभा केला होता. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे. यापुढेही नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी झगडत राहू.”
थेरगाव रुग्णालयातील ही नवीन सुविधा लवकर सुरू होणार असून रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे, काँग्रेसच्या महिला नेतृत्वाला शहरात चांगलीच पसंती मिळत आहे.



