शबनम न्यूज | प्रतिनिधी
न्यायालयीन अपील दाखल झालेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सहा आणि लोणावळ्यातील दोन प्रभागातील निवडणूक स्थगित झाली आहे. या जागांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर झाला असून २० डिसेंबर रोजी मतदान आणि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, तर दोन डिसेंबर रोजी ज्या जागांसाठी मतदान होणार आहे.त्याच्या प्रचाराची सांगता सोमवारी (एक डिसेंबर) रोजी रात्री दहा वाजता होईल. मंगळवारी मतदान आणि बुधवारी मतमोजणी होणार आहे.
तळेगाव दाभाडे येथील प्रभाग दोन ‘अ’, प्रभाग सात ‘अ’ आणि ‘ब’, प्रभाग आठ ‘अ’ व ‘ब’ आणि प्रभाग दहा मधील ‘ब’ अशा सहा जागेवरील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. प्रभाग आठ ‘ब’ या जागेवर आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुदाम शेळके निवडणूक लढवत आहेत. निवडणूक स्थगित झालेल्या ठिकाणी नवीन अर्ज स्वीकारला जाणार नाही. केवळ अर्ज मागे घेण्यासाठी मुदत दिली जाणार आहे.
लोणावळ्यातील प्रभाग क्रमांक पाच ‘ब’ नांगरगाव आणि प्रभाग क्रमांक दहा ‘अ’ गवळीवाडा या दोन जागांवरील निवडणूक स्थगित झाली आहे. येथे आता २० डिसेंबर रोजी मतदान होईल. तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या २२ जागांसाठी मंगळवारी ( २ डिसेंबर) मतदान होणार असून सोमवारी रात्री प्रचार थांबणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले.








