शबनम न्यूज | प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आहे. याद्यांमधील गोंधळामुळे महापालिका निवडणूक यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर आरोप होत आहेत. राजकीय पक्षांनी वरिष्ठ अधिकार्यांना धारेवर धरले असून सत्ताधारी भाजपाच्या मदतीने हा घोळ केला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर या मतदार याद्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीत आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. झोपेत मतदार याद्या तयार केल्या का? अशा शब्दात त्यांना अधिकाऱ्यांना धारेवर धरले असल्याचे समजते.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गुरुवारी (दि.२०) प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी महापालिकेच्या मतदार यादी कक्षात, आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये, तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तेव्हापासून मतदार याद्यांमधील त्रुटी व चुकांवरून सातत्याने प्रशासनावर आरोप होत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी असे आरोप-प्रत्यारोप होत असून यात अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. या सगळ्यात महापालिकेत आयुक्त हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांबाबत एक आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत निवडणूक व मतदार याद्याचे कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्त हर्डीकर यांनी चांगलेच फैलावर घेतले. विधानसभा मतदारसंघाच्या याद्या फोडून प्रभागनिहाय याद्या तयार करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घेतलेली नाही. त्यामुळे यादीत चुका दिसून येत आहेत. यावरून आयुक्त हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. अधिकाऱ्यांना तुम्ही हे काम झोपेत केले का ? गांजा पिऊन काम केले का, अशा भाषेत आयुक्तांनी संताप व्यक्त केला.








