spot_img
spot_img
spot_img

थॅलेसेमिया मुक्तीसाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान

शबनम न्यूज | प्रतिनिधी
 “थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित आनुवंशिक आजार असून, दोन थॅलेसेमिया ‘मायनर’ व्यक्तींनी विवाह केल्यास, त्यांना होणारे मूल थॅलेसेमिया ‘मेजर’ होण्याची शक्यता २५ टक्क्यांपर्यंत असते. या आजारावर गर्भावस्थेतच तपासणीद्वारे प्रतिबंध घालता येऊ शकतो. या जनजागृतीसाठी आणि प्रतिबंधात्मक तपासणीसाठी ‘प्रिथम’ हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत आहे. थॅलेसेमिया मुक्तीसाठी शासकीय व खाजगी संस्थांनी एकत्रित काम करावे,” अशी भावना सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. राजीव येरवडेकर यांनी व्यक्त केली.
थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी ‘प्रिथम’ उपक्रमात सक्रिय योगदान देणाऱ्या रुग्णालयाच्या प्रतिनिधींचा मानचिन्ह देऊन ‘प्रिथम सन्मान’ करण्यात आला. आरोग्यसेवेत उल्लेखनीय योगदानाचा गौरव करणारा हा उपक्रम बाणेर येथील उमरजी मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल आणि जनकल्याण रक्तपेढी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. एरंडवणे येथील सेवाभवनात झालेल्या कार्यक्रमावेळी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजयकुमार तांबे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. प्रकाश गंभीर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील डॉ. शैलजा भावसार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे स्त्रीवैद्यक प्रमुख डॉ. असलकर, साने गुरुजी रुग्णालयाचे संयुक्त सचिव अरुण गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
डॉ. कल्पना बळीवंत यांनी ‘प्रिथम’ उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही पुणे महानगरपालिकेकडून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले. उमरजी हॉस्पिटलचे संचालक डॉ. चिन्मय उमरजी यांनी उपक्रमाचा उद्देश आणि पार्श्वभूमी स्पष्ट करताना रुग्णालय तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून गर्भवती महिलांचे समुपदेशन, आवश्यकतेनुसार गर्भजल परीक्षण करण्याबाबत माहिती दिली.
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विविध रुग्णालयांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. या रुग्णालयांमधील गर्भवती महिलांची थॅलेसेमिया तपासणी जनकल्याण रक्तपेढीच्या भारत विकास परिषद प्राथमिक लॅबमध्ये मोफत करण्यात आली. या कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या रुग्णालयांच्या प्रतिनिधींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे कार्यवाह प्रमोद गोऱ्हे आणि उमरजी रुग्णालयाच्या डॉ. मुक्ता उमरजी यांनी सर्वांचे सन्मान केले. भारत विकास परिषद पॅथॉलॉजी लॅबचे प्रमुख डॉ. अमोल राजहंस यांनी आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!