शबनम न्यूज | प्रतिनिधी
मतदार यादीतील दुबार नोंदीमुळे विरोधी पक्षांनी त्या दुरुस्त करून निवडणूक घेण्याची मागणी केलेली असताना आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये राज्यात जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगर पालिकांसह महानगरपालिकांची निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद बोलाविली आहे. दुपारी ४ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाण्याची शक्यता असून यानंतर लगेचच महाराष्ट्रात आचारसंहिता लागणार आहे. या काळात कोणतीही लोकप्रिय घोषणा, विकासकामे केली जाणार नाहीत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या २८ याचिकांवर आज (४ नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मतदार यादी, सीमांकन व प्रभाग आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. यासंबंधीच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिका देखील मुबईत वर्ग करण्यात आल्या आहेत.आज निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
मतदार यादीतील नाव नोंदणीसंदर्भात धक्कादायक बाब समोर आली आहे. २ ऑक्टोबर २०२४ नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची नोंदणी होत नसल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी माहिममधील तरुणीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावरही आज सुनावणी होणार आहे. या दोन्ही सुनावण्यांवर व संबंधित इतर घटनांवर आपलं लक्ष असेल.








