पिंपरी, दि. ३ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा दिवाळी सुट्टीनंतर आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. संकलित चाचणी परीक्षा संपल्यानंतर १७ ऑक्टोबर २०२५ रोजी शाळांना दिवाळीची सुट्टी लागली होती. या सुट्टीनंतर महापालिकेच्या शाळांमध्ये पुन्हा एकदा उत्साह दिसून आला. सकाळपासूनच शाळांच्या गेटबाहेर विद्यार्थ्यांचा गजबजाट, पालकांची लगबग आणि शिक्षकांच्या चेहऱ्यांवरील आनंद दिसत होता.
आज सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यानंतर शाळांमधील वातावरण पुन्हा एकदा आनंद आणि उत्साहाने भरून गेलं. अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये गप्पा रंगल्या, सुट्ट्यांमधील अनुभव ऐकवले गेले आणि शिक्षणाचा उत्साह पुन्हा वर्गात उमटला.
दरम्यान, दिवाळीनंतरचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढील परीक्षा, प्रकल्प आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी हा काळ तयारीचा आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत विशेष मार्गदर्शन सत्रं, प्रकल्प स्पर्धा आणि अभ्यासवर्ग घेण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने स्मार्ट क्लासरूम, ई-लर्निंग साधनं आणि डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून शहरातील शाळांना सक्षम बनविण्यावर महापालिका भर देत आहे. अनेक शाळांमध्ये प्रोजेक्टर, संगणक आणि इंटरनेटच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण दिलं जात आहे, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागातून देण्यात आली.








