शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ५५० संस्थाने अस्तित्वात होती, ती विलीनीकरण करताना सरदार पटेल यांनी संस्थानिक विरोधात एक आहिसंक मार्गाने लढा दिला आहे. कोणत्याही संस्थानिक यांना गोळ्या घातल्या नाही, हाकलून दिले नाही. गांधी यांचे अहिंसा तत्व त्यांनी प्रत्यक्षात राबवले आहे. राजेशाही ऐवजी त्यांनी लोकशाही देशात आणली. जबाबदार शासन पद्धती ही सरदार यांच्या हातात असलेली ढाल होती. लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य असते पण तो स्वैराचार नसते तर ती एक जबाबदारी असते हे त्यांनी सांगितले. सरदार पटेल हे व्यवहारी होते. अनेक समस्या मध्ये सुवर्णमध्य काढण्यात त्यांची हातोटी होती. लोकशाही तत्वे त्यांच्यात रुजलेली होती. तत्वांना व्यवहारात यशस्वी करणेसाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचा जीवनाचा अर्थ लोकशाही आणि गांधीवाद यात दडलेला होता
असे मत शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित लेखक कै. मामासाहेब देवगिरीकर लिखित सरदार वल्लभभाई पटेल (चरित्र व काळ) पुस्तकावरील परिसंवाद मध्ये ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषद येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख,डॉ. शिवाजीराव कदम ,डॉ.एम. एस.जाधव , ॲड.अभय छाजेड, विश्वंभर चौधरी, ॲड असीम सरोदे, लेखिका अंजली कुलकर्णी अन्वर राजन उपस्थित होते.
डॉ.पवार म्हणाले, सरदार पटेल हे मऊ मेणाप्रमाणे आतून असले तरी वेळप्रसंगी लोहपुरुष ही त्यांची ओळख होती. त्यांना स्वातंत्र्य, डावपेच, लष्कर बाबी, प्रशासन चांगल्याप्रकारे समजत होत्या. सरदार म्हणजे केवळ लष्कराचे प्रमुख नव्हते तर विवेक, विश्वास ,वैराग्य देखील त्यांच्यात होते. राष्ट्रासाठी त्यांनी वैराग्य पत्करले. मनातील बदलातून वैराग्य प्राप्त होत असते. राष्ट्रीय एकात्मता बाबत ते आग्रही होते. संस्थाने रद्द करताना
केंद्र प्रबळ आणि राज्य दुबळे अशी त्यांची मनधरणा नव्हती. राज्यांना देखील त्यांनी सक्षम बनवले. कोणत्याही गोष्टी मध्ये संवाद त्यांनी सातत्याने सुरू ठेवला त्यामुळे त्यांना यश मिळाले. ज्या तडजोडी त्यांनी केल्या त्या गरजेनुसार आवश्यक होत्या. विरोधक यांना त्याचे अर्थ उलगडत नाही. ज्या तडजोडी करायच्या त्या लेखी आणि परिणामकारक त्या करत हे व्यवहार कौशल्य त्यांच्याकडे होते. आज तडजोड म्हणजे केवळ बदला दिसून येत आहे.ते धार्मिक आणि धर्मनिष्ठ होते आणि धर्मनिरपेक्षता आग्रह धरणारे होते.धर्मनिरपेक्षता बद्दल त्यांनी तडजोड कधी केली नाही. अंधश्रद्धा आणि भाबडेपणा यांना त्यांनी कधी थारा दिला नाही. धर्मग्रंथ, भजने यापासून ते अलिप्त होते. परंतु त्यांनी ईश्वर गोष्ट कधी नाकारली नाही.विविध गोष्टीत सुवर्ण मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना त्यांनी केवळ पटेल यांचा रस्ता तयार केला नाही. तर त्यांच्यासोबत जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांचे देखील मार्ग एकत्रच होते. सरदार पटेल यांची सर्वात मोठी श्रद्धा महात्मा गांधी यांच्यावर होती, त्याप्रमाणे भारतीय लोकशाही यावर होती. लोक नावाच्या गोष्टीचा त्यांनी सातत्याने विचार केला. त्याकाळी चळवळीला बदनाम ठरवण्यात आले होते पण त्यास त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली.
लोकशाही प्रयोगशीलता त्यांच्यात दिसून येते. लोकांना सोबत घेतल्याशिवाय सरदार पटेल काही करत नव्हते. अहिंसा याला त्यांनी प्राधान्य दिले होते कारण लोकशाही तोपर्यंतच जिवंत हे त्यांना माहिती होते. सरदार हे सर्व लढ्याबाबत उतावळे नव्हते तर संयमी आणि विवेकी होते हे दिसून येते. सरदार यांना भारतीय लोकशाही मोडतोड करण्यात रस नव्हता तर ती घडविण्यात त्यांचे योगदान होते.
डॉ.लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, खेडा सत्याग्रहात सरदार पटेल यांनी महात्मा गांधींच्या प्रभावात येऊन त्यांच्यासोबत सत्याग्रही मार्गाने शेतकऱ्यांसाठी लढा दिला. भारतीय संविधान निर्मितीत देखील पटेलांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण होती.अल्पसंख्यांक, दलितांच्या बाबतीतील कायदे व आरक्षणाबाबतच्या कार्यात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे.सरदार पटेल यांचे संघटन कौशल्य अभूतपूर्व होते.
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, महात्मा गांधी यांचे जीवन चरित्र जागृत ठेवण्याचे काम महाराष्ट्र गांधी स्मारक निधी मार्फत करण्यात येत आहे. सरदार पटेल यांचे देखील चैतन्य टिकवण्याचे काम आता करण्यात येणार आहे. ज्यांना गांधी कळले नाही त्यांना देश समजला नाही. नव्या देशाची पायाभरणी काँग्रेस मधील तत्कालीन सर्व नेतृत्वाने मिळून केली. देशाचा स्वातंत्र्य लढा गांधी यांना वगळून पूर्ण होऊ शकत नाही. सध्या गुजरात मध्ये गांधी पुसण्याचे काम करण्यात आले आणि हिंदुत्वाची प्रयोगशाळा राबविण्यात आली. पोलादी पुरुष इतकीच मर्यादित सरदार पटेल यांची प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे. नेहरू आणि पटेल यांच्यात वाद होता असे खोटे सांगून भाजपने पटेल यांना हायजॅक करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अन्वर राजन यांनी केले.








