पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांच्या हस्ते झाले. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार व ज्येष्ठ नेते अॅड. अभय छाजेड, सुनिल शिंदे, अजित दरेकर, यासीन शेख, सचिन आडेकर, आबा जगताप, विठ्ठल गायकवाड, भारत सुराणा, सीमा महाडिक, हेमंत राजभोज, संतोष पाटोळे, अनुसया गायकवाड, सुंदरा ओव्हाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
विश्वंभर चौधरी म्हणाले, “नेहरुंनी बांधलेली धरणे आज जीर्णावस्थेत असून, त्यांची देखभाल सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून होत नाही, ही खंतजनक बाब आहे. २०१४ पासून ‘नवीन देशभक्तांची’ एक तुकडी निर्माण झाली असून, त्यांचे काम फक्त देशासाठी कार्य करणाऱ्या नेत्यांची बदनामी करणे आहे. अशा विकृतींना विचारांच्या बळाने प्रत्युत्तर द्यावे लागेल. पं. नेहरु, इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे.”
उल्हासदादा पवार म्हणाले, “इंदिरा गांधी या खऱ्या अर्थाने ‘आयरन लेडी’ होत्या. पाकिस्तानला शरणागती पत्करायला भाग पाडण्याची ताकद त्यांनी दाखवून दिली. सिक्किमला भारतात विलीन करून त्यांनी देशाचे सार्वभौमत्व दृढ केले. त्यांचे नेतृत्व आणि धैर्य जागतिक पातळीवर भारताला सन्मान मिळवून देणारे ठरले.”
प्रास्ताविक अॅड. अभय छाजेड यांनी केले. ते म्हणाले, “आज इतिहासाची मोडतोड करून राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा अवमान केला जात आहे. इंदिरा गांधी यांनी देशाचे प्रभावी नेतृत्व करत जगाच्या राजकारणात भारताला बळकट स्थान मिळवून दिले. मुंबई महाराष्ट्रात आणण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाद्वारे त्यांचे विचार आणि कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.” अक्षय जैन यांनी आभार मानले.








