spot_img
spot_img
spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पहिले आरोग्य साहित्य संमेलन रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. विख्यात साहित्यिक डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, प्रसिद्ध गायक-संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त यशराज पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाच्या संयोजनामध्ये रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष (मुंबई), अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालगंधर्व परिवार ट्रस्ट, पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र साहित्य परिषद, ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशन या संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे. या निमित्ताने पुणे आरोग्य महोत्सवाचेही आयोजन केले आहे. आरोग्य महोत्सवामध्ये २५ हजार ते ४० हजार रुग्णांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. पुण्यातील नामांकित हॉस्पिटल व त्यातील तज्ज्ञ डॉक्टर यावेळी पुणेकर नागरिक, कलाकार, साहित्यिक, पत्रकार यांची आरोग्य तपासणी करणार आहेत. दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आरोग्य विषयक वैचारिक मेजवानी व आरोग्य तपासण्या करून घेण्यासाठी पुणेकर नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
उद्घाटनानंतर सकाळची ११.३० वाजता ‘अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र करूया’ या परिसंवादामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक प्रवीण तरडे, अंमली पदार्थविरोधी दलाचे उप-महानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील सहभागी होणार असून, प्रा. डॉ. मिलिंद भोई परिसंवादाचे अध्यक्ष असणार आहेत. दुपारी १ वाजता पद्मश्री डॉ. स्मिता व डॉ. रवींद्र कोल्हे यांना पुणेकरांच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी उद्योजक पुनीत बालन, ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, रुबी हॉल हॉस्पिटलचे डॉ. प्रसाद मुगलीकर, सह्याद्री हॉस्पिटलचे उपाध्यक्ष सचिन कुलकर्णी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ३ वाजता होणाऱ्या सत्रात डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. प्रमोद जोग, डॉ. प्रदीप आवटे यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी ४ वाजता विशेष सन्मान सोहळा आणि सांगीतिक मैफलीचे आयोजन केले असून, यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, आदी उपस्थित राहणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे, माजी उपसंचालक डॉ. हनुमंत चव्हाण, पुणे मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे आणि डॉ. सूर्यकांत देवकर, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सूरज चव्हाण यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. गायक अमर पुणेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी ५.३० वाजता ‘स्त्री आरोग्य समृद्ध करूया’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सुनीताराजे पवार यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते होणार आहे. प्रसंगी प्रसिद्ध गायक-संगीतकार डॉ. उत्कर्ष शिंदे, स्त्री-रोग तज्ञ डॉ. ऐश्वर्या रेवडकर, पुणे पुस्तक महोत्सवाचे संस्थापक राजेश पांडे, माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ६.३० वाजता ‘शहरी व ग्रामीण आरोग्यवस्थेपुढील आव्हाने’ या परिसंवादाचे आयोजन केले असून, आरोग्य क्षेत्रात पत्रकारिता करणाऱ्या विविध वृत्तपत्रातील सन्माननीय पत्रकार यामध्ये सहभागी होणार आहेत. या परिसंवादामध्ये माजी सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, अभिनेते सुरेश विश्वकर्मा व अभिनेते रमेश परदेशी यांच्या उपस्थितीत संतोष आंधळे, विकी पाठारे, स्टेफी थेवर, ज्ञानेश्वर भोंडे, तेजस टवलारकार, संदिप पिंगळे, संजय जाधव, उमेश इसाळकर, चैत्राली देशमुख, प्रज्ञा केळकर-सिंग आदी विचार मांडणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता ‘तणावमुक्त जीवन’ यावर सिनेअभिनेते डॉ. संजीव कुमार पाटील यांचे सादरीकरण होणार असून, यावेळी डॉ. ऋतुपर्ण शिंदे, डॉ. अमोल देवळेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

रात्री ८ वाजता संमेलनाचा समारोप राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महानगर पालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. प्रसंगी माजी आयपीएस अधिकारी चंद्रशेखर दैठणकर, आमदार सुनील कांबळे, संमेलनाध्यक्ष डॉ. संजय ओक यांची भाषणे होणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष उमेश चव्हाण, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी डॉ. मिलिंद भोई, मिलिंद गायकवाड, राजेंद्र कदम, आशिष गांधी आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!