spot_img
spot_img
spot_img

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार’ प्रदान

शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पुणे: शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात आयोजित छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 
याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते ठाकूर अनुप सिंह आणि रोहित रॉय, परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे, संतोष नारायणकर, सुप्रसिद्ध साहित्यिक किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, अमोल कुंभार, विजया गायकवाड यांसह अनेक मान्यवर,तसेच सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्यकारी अधिकारी अक्षित कुशाल, विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. चोरडिया यांच्या दीर्घकाळ चाललेल्या शैक्षणिक, सामाजिक व संशोधनात्मक योगदानाची दखल घेत त्यांना या राष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले.
डॉ. शरद गोरे म्हणाले, “प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे कार्य हे केवळ शिक्षण क्षेत्रापुरते मर्यादित नसून त्यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन बनवले आहे. समाजाच्या विकासासाठी त्यांनी निस्वार्थ भावनेने आयुष्य अर्पण केले आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचा संदेश मिळतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या अदम्य शौर्य, त्याग आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या आदर्शाशी साधर्म्य असलेल्या त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून आम्ही त्यांना हा पुरस्कार प्रदान करत आहोत.”

सन्मान स्वीकारताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार मला केवळ सन्मान देत नाही, तर शिक्षण आणि समाजसेवेत निष्ठावंत योद्धा म्हणून समर्पित राहण्याची प्रेरणा देखील देतो. हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरवाचा क्षण नाही, तर जीवनातील सर्वोच्च सन्मान असून, माझ्या कार्याला दिशा देणारा आणि सामाजिक जबाबदारीची आठवण करून देणारा आहे. या सन्मानाबद्दल मी डॉ. शरद गोरे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांचा मनःपूर्वक आभारी आहे.”

ते पुढे म्हणाले, “सूर्यदत्त संस्थेत आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची, पराक्रमाची आणि नेतृत्वाची शिकवण देतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या धैर्य, दूरदृष्टी आणि कर्तृत्वाचा आदर्श ठेवावा तसेच समाजात सन्मान, निष्ठा आणि जबाबदारीची उदाहरणे घडवावी, अशी आमची नेहमीच अपेक्षा असते. धाडस हे फक्त शब्दात नसून सत्कर्मातून दिसले पाहिजे आणि त्याच वेळी आपली जबाबदारी व संयम यांचेही भान ठेवले पाहिजे. हीच खरी शिकवण आहे, जी महाराजांच्या आयुष्यातून मिळते आणि जी प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात प्रेरणादायी ठरू शकते.”

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!