शबनम न्यूज | प्रतिनिधी
मराठी संस्कृती आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत मराठी माझा अभिमान असोसिएशनतर्फे सुरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता सिम्बायोसिस ऑडिटोरियम, विमाननगर पुणे येथे ही संगीत मैफल रसिकांना अनुभवता येणार आहे, अशी माहिती असोसिएशनच्या उपाध्यक्षा अनिता लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी सचिव रेखा वाबळे, खजिनदार वृषाली मिरजगांवकर, सदस्य अश्विनी देसाई, ऍड. नीलिमा चव्हाण, स्नेहा सांडभोर, अनिता नेवे, मुक्ता जगताप आदी उपस्थित होत्या.
अनिता लोखंडे म्हणाल्या, “असोसिएशनच्या संस्थापिका मिनल देशमुख यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम होत आहे. दिवाळीच्या मंगलमय पहाटेला, सुरांची उधळण, गाण्याची मैफल आणि आनंदाचा जल्लोष याची अनुभूती या कार्यक्रमातून मिळणार आहे. ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांचे बहारदार सादरीकरण, मिलिंद कुलकर्णी यांचे ओघवते निवेदन ऐकण्याची संधी रसिकांना मिळेल. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.”
रेखा वाबळे म्हणाल्या, “पुणे हे संगीत, नाट्य, साहित्य आणि कलेचे माहेरघर आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सव, पुणे फेस्टिवल, गणेशोत्सव सांस्कृतिक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी ‘मराठी माझा अभिमान असोसिएशन’ जून २०२४ पासून कार्यरत आहे.”
वृषाली मिरजगांवकर यांनी सांगितले की, श्रावणसरी, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, सामूहिक श्रीसुक्त पठण, ढोलताशा, लेझीम, शंखनाद यांचे प्रशिक्षण असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. आषाढी वारीमध्ये शिधा वाटप व आपत्ती काळात गरजूंना मदत अशी सामाजिक कार्येही केली आहेत.”