spot_img
spot_img
spot_img

महापालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन व व्यवस्थापन सुधारण्यासाठी पाणी मीटर बसविण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत कोणत्याही व्यक्तीने किंवा समूहाने विरोध केला, तर त्यांच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करा. तसेच अनधिकृत नळजोडणी खंडित करण्याच्या कारवाईला गती द्या, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले आहेत.

पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि मर्यादित पाणीसाठा लक्षात घेता, शहरातील पाणीपुरवठ्याचे अचूक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचा हिशोब ठेवण्यासाठी, पाण्याची गळती रोखण्यासाठी आणि अनधिकृत वापर टाळण्यासाठी, महापालिकेने सर्व प्रकारच्या नळजोडण्यांवर पाणी मीटर बसविणे अनिवार्य केले आहे. ही मोहीम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारे राबवली जात आहे. या मोहिमेमुळे शहरातील प्रत्येक पाणीपट्टीधारकाची माहिती मिळेल आणि अनधिकृत नळजोडणी पूर्णपणे संपुष्टात येईल.

आतापर्यंत शहरात १० हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळजोडणी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पाणी मीटर बसविण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. घरगुती वापरासाठी मीटर व नळजोडणीचा खर्च पाणीपट्टीधारकांकडून पाणीबिलातून हप्त्याने वसूल केला जाणार आहे. तरी सर्व पाणीपट्टीधारकांनी तात्काळ पाणी मीटर बसवून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.

याशिवाय शहरातील व्यावसायिक पाणी वापरावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हॉटेल्स, वॉशिंग सेंटर्स, बांधकामे, आर.ओ. प्लांट्स, रेस्टॉरंट्स आणि इतर सर्व व्यावसायिकांनी पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत व्यावसायिक वापर तात्काळ थांबवावा. ज्यांनी अनधिकृत नळजोडणी घेतली आहे, त्यांनी ती त्वरित नियमित करून मीटर बसवावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड शहराला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब मोजला जाणे आवश्यक आहे. पाणी मीटरमुळे पाणी वापराची अचूक आकडेवारी मिळेल, ज्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आणि अपव्यय टाळणे शक्य होईल. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून पाणी मीटर बसवून घ्यावे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!