spot_img
spot_img
spot_img

मान्यवरांचा सहभाग असलेल्या साहित्यिक चर्चेतून उलगडणार मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा प्रवास

शबनम न्यूज , प्रतिनिधी :

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून अभिजात मराठी भाषा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
या आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमांत एकांकिका, नाटक, अभिवाचन, कवी संमेलन, भजन, गायन, नाट्यप्रयोग आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेवर आधारित सर्जनशील कार्यशाळा यासह मराठी भाषेचा गौरव वाढविणारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले आहेत.
या निमित्ताने पाचव्या दिवशी (७ ऑक्टोबर) सकाळी ११.३० वा. निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रवास या विषयावर साहित्यिक चर्चा होणार आहे. या चर्चेत अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविलेले माजी अध्यक्ष सहभागी होणार आहेत.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वयक किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली होत असलेल्या या सप्ताहातील साहित्यिक चर्चेमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविलेले डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख आणि भारत सासणे सहभागी होणार आहेत. तर ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी हे सूत्रसंचालन करणार आहेत.
साहित्यिक चर्चेत मराठी भाषेच्या विकासाचा इतिहास, विविध युगांतील साहित्यिक प्रवाह आणि मराठी संस्कृतीच्या वैशिष्ट्यांविषयी सविस्तर चर्चा केली जाईल. उपस्थितांमध्ये शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक आणि सामान्य नागरिक सहभागी होऊन चर्चेत सजीव संवाद साधू शकतील.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रवास जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 सप्ताहदरम्यान निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सकाळी ११.३० वा. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रवास या विषयावर साहित्यिक चर्चा होणार आहे. दुपारी १२ वा. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री, अभिनय बेर्डे व निर्मिती सावंत अभिनित आज्जी बाई जोरात हे बालनाट्य सादर होणार आहे.
यासोबतच चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी १२ वा. खास महिलांसाठी ‘रुपानं देखणी’ हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये माया खुटेगावकर, संगीता लाखे, अर्चना जावळेकर आणि नमिता पाटील या आपली कला सादर करणार आहेत.सायंकाळी ५ वा. प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर व विजय केंकरे प्रस्तुत नात्याभिनय असलेले ‘पत्रा पत्री’ हे नाटक रंगणार आहे. तर रात्री ९ वा. डॉ. गिरीश ओक, सुनील गोडबोले, अमोल बावडेकर, डॉ. प्रचीती सुरु आणि रुपाली पात्रे अभिनित ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक सादर होणार आहे.
तसेच पिंपरी येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात दुपारी १२ वा. खास महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘राजा सिंह’ हे बालनाट्य सादर होणार आहे.
शहरातील रसिक प्रेक्षक व विद्यार्थ्यांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!