पिंपरी, ५ ऑक्टोबर २०२५ : शब्दांचे झंकार, कवितेच्या लयीतील गोडवा आणि पु. ल. देशपांडे व सुनिता देशपांडे यांच्या आठवणींच्या दरवळात न्हालेल्या ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे…’ या नाट्यमय कविसफरीने रसिकांच्या अंतःकरणाला स्पर्श केला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उसळलेला टाळ्यांचा गजर, भारावलेल्या नजरा आणि स्नेहाने उजळलेले चेहरे यावरूनच या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्याचे अधोरेखित झाले.
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने, तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली साजरा करण्यात येत असलेल्या या महोत्सवात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे…’ हा कार्यक्रम सादर झाला. याप्रसंगी महापालिकेच्या उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि काव्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. समीर कुलकर्णी यांच्या ‘तप:स्वाध्याय’ या लेखावरील संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर (Where the Mind is Without Fear) या कवितेच्या मूळ हस्तलिखित प्रतीच्या शोधाचा प्रवास मांडला आहे. त्या कवितेचा शोध घेताना पु.ल. देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनिता देशपांडे यांना आलेल्या अनुभवातून फुललेला हा प्रवास म्हणजे शब्द, संगीत आणि भावना यांचा सुरेल संगम ठरला. या कार्यक्रमात सुनिता देशपांडे यांची मुख्य भूमिका अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी साकारली असून त्यांनी आपल्या प्रभावी आवाजाने आणि भावपूर्ण उच्चारांनी कवितांचे सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाने सभागृहात एक क्षण शांतता आणि पुढच्या क्षणात टाळ्यांचा झंकार, अशी काव्यात्मक लय निर्माण केली.
मुक्ता बर्वे यांच्यासोबतच कलाकार अमित वझे, मानसी वझे, निनाद सोलापूरकर, अंजली मराठे आणि पार्थ उमराणी यांनी कविता सादरीकरणातून प्रेक्षकांना एकप्रकारे काव्यप्रवास घडवला. कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणून मयुरेश गोखले यांनी काम पाहिले.
……..
‘गजरा नाट्यछटांचा’ कार्यक्रमाला प्रतिसाद
पिंपरी चिंचवड शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘गजरा नाट्यछटांचा’ हा कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला होता. या नाट्यछटा स्पर्धेत अन्वी कानडे, जिजा महिंद्रिकर, अभिन्या रंगारी, श्रीनिधी बिडवई, सार्थक माळी, आरोही डावखरे, दुर्वा सुरवसे, हिंदवी वारूळे, मनस्वी खेराडे, अन्यना बिनगुडे, साई गायकवाड, मनस्वी कमंडले, प्रतिक साळवे, प्रणाली शेट्टी, प्रियंका काळे, ओवी भोंडवे, शिवम मराठे, भक्ती शिवले, प्रगती पौळ, श्रावणी राऊत, तनया गावडे, पूनम बांगर, अनुष्का गव्हाणे, ज्ञानेश्वरी गडदे, सेजल थिटे, राजवर्धन शिंदे, आरूष वाडेकर, कौस्तुभ साताळकर, काव्या साताळकर, आराध्या कणसे, मधुरा शिंदे, मयुरी भोंडे, प्रेम सूर्यवंशी आणि ललित बेदडे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी विविध मराठी नाटकांतील संवादांचे प्रभावी सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास डोरनाळीकर यांनी केले.
…….
‘प्राणी आणि गाणी’ गीतांच्या मैफलीतून निसर्गप्रेम आणि संवेदनशीलतेचा संदेश
अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने प्रदीप निफाडकर प्रस्तुत ‘प्राणी आणि गाणी’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सादर झाला. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीमध्ये निसर्ग, प्राणी, पक्षी यांचे अस्तित्व कशा प्रकारे प्रतिबिंबित झाले आहे, यावर या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. मराठी गीतांच्या या मैफलीने सभागृहात भावस्पर्शी वातावरण निर्माण केले. जलसंपत्तीचे संवर्धन, प्राणीमात्रांबद्दलची करुणा आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत या गीतांनी सामाजिक जाणिवांना उजाळा दिला.
…………..
दिनांक ६ ऑक्टोबर
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे होणारे कार्यक्रम
सकाळी ९ वाजता – स्थानिक कलावंतांच्या गाजलेल्या एकांकिकाचे सादरीकरण
दुपारी १२ वाजता – अलबत्या गलबत्या (मराठी बालनाट्य – खास महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी)
सायंकाळी ५ वाजता – सूर्याची पिल्ले (मराठी नाटक)
रात्री ९ वाजता – राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी (मराठी चित्रपट गीतांचा संगीतमय प्रवास)
………….
ग.दि.माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी प्राधिकरण येथे होणारे कार्यक्रम
सायंकाळी ५ वाजता – शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम
………
कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे होणारे कार्यक्रम
सकाळी १० वाजता – भजन स्पर्धा