शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरात वारंवार घडत असलेल्या लिफ्ट दुर्घटना घडत आहेत. गृहप्रकल्पांमधील उदवाहन (लिफ्ट) अपघातांबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आमदार शंकर जगताप यांनी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
२ ऑक्टोबर २०२५ रोजी चोविसावाडी, चऱ्होली येथील राम स्मृती सोसायटीमध्ये १२ वर्षांच्या अमेय फडतरे ह्याचा दुर्दैवी मृत्यू लिफ्ट अपघातामुळे झाला. तसेच अनेक वेळा अशा दुर्घटना होत आहेत. त्यामुळे आमदार जगताप यांनी म्हटले की, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लिफ्टची नियमित तपासणी न केल्यामुळे सातत्याने प्राणहानी आणि गंभीर अपघात होत आहेत. “वारंवार घडणाऱ्या या अपघातांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे,” असे आमदार जगताप यांनी सांगितले.
तसेच या बाबत पुढील उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणीही जगताप यांनी केली आहे.
शहरातील सर्व सोसायट्यांमधील लिफ्टची तपासणी करून प्रमाणित अहवाल सादर करावा. निकृष्ट व अप्रमाणित लिफ्ट त्वरित बंद करून शासनाच्या नियमावलीनुसार कारवाई करावी. नियमांचे पालन न करणाऱ्या बिल्डर, डेव्हलपर व सोसायटी व्यवस्थापनांवर दंडात्मक व कठोर कारवाई करावी. प्रत्येक सोसायटीमध्ये प्रशिक्षित लिफ्टमनची नियुक्ती सक्तीची करावी. लिफ्ट सुरक्षिततेसंबंधी नागरिकांसाठी जनजागृती मोहीम राबवावी. पिंपरी चिंचवड शहरातील गृहप्रकल्पांतील लिफ्टच्या सुरक्षा ऑडिटसाठी तातडीने कारवाई करावी आणि केलेल्या कार्यवाहीची प्रत त्यांना मिळावी अशी मागणी सुद्धा या निवेदनाच्या माध्यमातून आमदार जगताप यांनी केली आहे.
नागरिकांच्या जीविताच्या धोका निर्माण करणाऱ्या या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याने संबंधित विभागांनी तातडीने ठोस व काटेकोर कारवाई करावी, असे आमदार जगताप यांनी म्हटले आहे.