spot_img
spot_img
spot_img

सांगोलेकर लिखित ‘विश्वबंधुतेची प्रकाशवाट’ पुस्तकाचे प्रकाशन

शबनम न्यूज | प्रतिनिधी
“स्वातंत्र्य आणि समतेला बंधुतेची जोड नसेल, तर लोकशाहीचे स्वरूप अपूर्ण राहते. समाजातील तणाव, दुभंगलेली मने आणि विषमता दूर सार्याची असेल, तर बंधुतेचा विचार जनमानसात रुजणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण बंधुता ही केवळ एक सामाजिक मूल्य नसून, प्रगल्भ लोकशाहीचा प्राण आहे,” असे मत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश सांगोलेकर लिखित आणि बंधुता प्रकाशन प्रकाशित ‘विश्वबंधुतेची प्रकाशवाट’ या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रकांत दळवी यांचे हस्ते झाले. रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात झालेल्या प्रकाशन  सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजनिष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल होते. प्रसंगी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्रा. शंकर आथरे, संगीता झिंजुरके, दत्तात्रय गायकवाड, डॉ. प्रभंजन चव्हाण आदी उपस्थित होते.
चंद्रकांत दळवी म्हणाले, “बंधुता चळवळीचा हा प्रवास ५१ वर्षांचा आहे. विविध साहित्य संमेलने, काव्य महोत्सव, बंधुता पुरस्कारांतून बंधुतेचे मूल्य खोलवर रुजवण्याचा रोकडे यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. समाजाला एकसंध ठेवण्यासाठी आवश्यक बंधुता विचार व्यापक करण्याचा हा प्रवास यापुढेही चालू राहावा.”
कृष्णकुमार गोयल म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. ध्येयासक्तीने ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्यावेत. आपल्यातील सुप्त गुण ओळखून करिअर घडवण्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा अंगीकारावा. परस्परांचा सन्मान, बंधुभाव जोपासून एकमेकांच्या साथीने राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे.
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “महामानवांच्या मूल्यविचारांचे बळ, प्रज्ञावंताची दृष्टी, विचारवंतांचे विचार, धनवंतांचे धन आणि सहकारी कार्यकर्त्यांची कृतिशील साथ हे बंधुता चळवळीच्या यशाचे गमक आहे. ही चळवळ अधिक व्यापक होण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करावेत.”
डॉ. अविनाश सांगोलेकर म्हणाले, “बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी पाच दशकांहून अधिक काळ बंधुता, राष्ट्रबंधुता आणि विश्वबंधुता या तीन टप्प्यांवर केलेल्या यशदायी आणि प्रेरणादायी कार्याचे दस्तावेजीकरण म्हणजे हे पुस्तक आहे.”
महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. महात्मा गांधी आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. अरुण आंधळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. मंदाकिनी रोकडे यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!