शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याचा कार्यक्रमाअंतर्गत राजकीय पक्षाने जिल्ह्यातील पात्र मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता सहकार्य करावे, असे प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार नव्याने तयार करण्याबाबत राजकीय पक्षासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, निवडणूक तहसीलदार राहूल सांरग, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले, सन २०२६ मध्ये होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु आहे, याकरिता पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वीच्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयादीत नाव समाविष्ठ असले तरी पात्र मतदारांचे नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करावे लागणार आहे. मतदार नोंदणीकरिता एकगठ्ठा पद्धतीने अर्ज स्विाकारले जाणार नाहीत, याची सर्व राजकीय पक्षानी नोंद घ्यावी.
पदवीधर मतदारसंघाकरिता मतदाराचे नाव मतदार यादीत नोंद करण्याकरिता १ नोव्हेंबर २०२२ या दिनांकापर्यंत पदवी परीक्षा किंवा पदवी समकक्ष पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिक्षक मतदासंघाकरिता मतदार हा १ नोव्हेंबर २०१९ ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत माध्यमिक शाळेत किमान ३ वर्ष पूर्ण वेळ अध्यापन केलेला असावा. याबाबत संबंधित शिक्षकाने शाळेत अध्यापन केल्याबाबतचे संस्थाव प्रमुखाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे. मतदार नोंदणीकरिता नियुक्त अधिकारी अर्ज भरण्याबाबत अधिक माहिती देतील.
जिल्ह्यात सन २०२० च्या मतदार यादीप्रमाणे पदवीधर मतदारसंघाकरिता १ लाख ३६ हजार ६११ आणि शिक्षक मतदारसंघाकरिता ३१ हजार २०१ मतदार आहेत. पुणे जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार करता ही संख्या कमी आहे. येत्या निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व पात्र मतदारचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ करण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहे. मतदारांनी देखील आपले नाव मतदार यादीमध्ये नोंद करुन घ्यावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
श्रीमती कळसकर म्हणाल्या, मतदार याद्याच्या पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत येत्या ३० डिसेंबर २०२५ रोजी मतदार यादीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यामुळे अधिकाधिक पात्र मतदारांनी या कार्यक्रमात सहभागी होवून मतदार यादीत आपल्या नावाची नोंद करुन घ्यावी, असे आवाहन श्रीमती कळसकर म्हणाल्या.
याबैठकीत मतदार नोंदणीचे टप्पे, मतदार नोंदणीचे अर्ज भरतांना घ्यावाची काळजी, अर्जाची छाननीपक्रिया, मतदार अर्हता, शैक्षणिक कागदपत्रे, आदी बाबत माहिती देण्यात आले.