शबनम न्यूज | प्रतिनिधी
दी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाची घटक संस्था असलेल्या दी नॅशनल अक्रेडिएशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंगच्या (नाबेट) मानांकनात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त नॅशनल स्कुलला घवघवीत यश मिळाले आहे. दर्जेदार शिक्षणाच्या प्रवासात मिळालेला हा पुरस्कार ‘सूर्यदत्त’च्या प्रगतीतील महत्वाचा टप्पा आहे. ही मान्यता शाळेच्या उत्कृष्ट दर्जाच्या शालेय प्रशासनाप्रती असलेल्या ठाम वचनबद्धतेचे, सर्वांगीण विकासाच्या ध्येयाचे आणि प्रेमळ तसेच सर्वसमावेशक शिकण्याच्या वातावरणाच्या जपणुकीचे प्रतीक आहे.
‘नाबेट’ ही अतिशय प्रतिष्ठित अशी संस्था असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानदंडाची पूर्तता करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना मानांकन देऊन गौरव करते. ‘नाबेट’ मानांकन हे गुणवत्तेच्या हमीचे प्रतीक असून, संस्थेच्या प्रशासन, शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सहाय्य या सर्व क्षेत्रांतील सर्वोत्तम पद्धतींचे पालन दर्शवते.
२०१४ साली पुण्यातील बावधन येथे स्थापन झालेली सूर्यदत्त नॅशनल स्कूल ही सर्वांगीण व विद्यार्थी-केंद्रित शिक्षण अनुभव देण्यास कटिबद्ध असलेली एक अग्रगण्य शाळा आहे. शाळेने व्यापक मानांकन प्रक्रिया पूर्ण करत कार्यप्रणालीचे १५ मानके आणि ५० मापदंडांच्या आधारे काटेकोर मूल्यमापन झाले. यातून शाळेच्या प्रशासन व शैक्षणिक आराखड्याचा सर्वांगीण आढावा घेतला गेला. जानेवारी २०२५ मध्ये तीन अनुभवी मूल्यांकनकर्त्यांचा समावेश असलेल्या ‘नाबेट’च्या लेखापरीक्षण पथकाने शाळेला भेट देऊन सखोल मूल्यांकन केले.
प्रमुख हितधारकांसोबत प्रारंभीची बैठक व शाळेची दृष्टीकोन व यशांविषयी सादरीकरण, दस्तऐवजांचे परीक्षण, नोंदी व अहवालांचे निरीक्षण, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांची मुलाखत घेऊन अभिप्राय व दृष्टिकोनाची नोंद, वर्ग निरीक्षण करून अध्यापन-शिकण्या प्रक्रियेचे मूल्यमापन, पायाभूत सुविधा व सोयीसुविधांची पाहणी, आरोग्य व सुरक्षिततेच्या उपाययोजना याविषयी तपासणी झाली. शाळेची माहिती, शासन, नेतृत्व आणि प्रशासन, ध्येय व उद्दिष्टे, दस्तऐवजीकरण, आर्थिक संसाधने, भौतिक पायाभूत सुविधा व सहाय्यक सुविधा, मानव संसाधन व्यवस्थापन, अभ्यासक्रम व शैक्षणिक कार्यक्रम, अध्यापन–शिकण्याची प्रक्रिया, मूल्यमापन व आढावा, प्रवेश प्रक्रिया, मार्गदर्शन व समुपदेशन सेवा, शैक्षणिक साधने, आरोग्य व सुरक्षा उपाययोजना, जोखमी व संधी, शाळेच्या कार्यप्रदर्शनाचे मोजमाप व सुधारणा अशा विविध मानकांद्वारे हे मूल्यांकन करण्यात आले.
सखोल लेखापरीक्षणानंतर समारोपाच्या बैठकीत पथकाने आपली निरीक्षणे व शिफारसी मांडल्या. त्यानंतर आवश्यक अतिरिक्त कागदपत्रे सादर करून व सर्व लेखापरीक्षण निकषांची यशस्वी पूर्तता करून शाळेला ‘नाबेट’ मानांकनाचे औपचारिक मान्यतापत्र मिळाले. हे मान्यतापत्र सुरुवातीला ई-मेलद्वारे, तर अधिकृत प्रमाणपत्र ८ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदान करण्यात आले. हे मानांकन जानेवारी २०२९ पर्यंत वैध राहणार आहे.
महाराष्ट्रातील १६४२ शाळांपैकी केवळ २० शाळा ‘नाबेट’ मानांकनासाठी पात्र ठरल्या. याआधी पुण्यातील केवळ चारच शाळांना ही मान्यता मिळाली होती. आता त्यामध्ये सूर्यदत्त नॅशनल स्कुलचा समावेश झाला आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही मान्यता शाळेच्या अपेक्षेपेक्षा अधिक गुणवत्तापूर्ण कामगिरी करण्याच्या बांधिलकीला आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च शैक्षणिक मानकांशी सुसंगत राहण्याच्या प्रयत्नांना अधोरेखित करते. या यशाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी शाळेचे, प्राचार्याचे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांचे अभिनंदन केले आहे.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “हे मानांकन हा एक ऐतिहासिक टप्पा असून, त्यातून आपल्या संपूर्ण शालेय समुदायाचा, ज्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारीवर्ग आणि पालक यांचा सहभाग, परिश्रम, निष्ठा आणि बांधिलकीचे योगदान आहे. प्राचार्या शीला ओका, अक्रेडिएशन कमिटी मेम्बर्स डॉ. अनुपमा नेवरेकर, प्राजक्ता काटकर, अंजली चौहान, अपर्णा नायर, गौरव शर्मा, मोनिका हजारे, वृषाली पिसाळ आणि नीता पाटील यांचे अथक परिश्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे. पालकांचा, हितचिंतकांचा खंबीर पाठिंबा, विश्वास हेही तितकेच महत्वाचे आहे.
या मान्यतेमुळे शाळेच्या सुरु असलेल्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले आहेच; परंतु भविष्यातील विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन लाभले आहे. आपल्या प्रणालींना अधिक मजबूत करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या अनुभवांना सुधारण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श ठेवण्याच्या दृष्टीने शाळा कार्यरत राहील. सूर्यदत्त नॅशनल स्कूल प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगती करण्यास सक्षम अशा वातावरणाची निर्मिती करण्यासाठी कटिबद्ध आहे, तसेच शिक्षण व प्रशासनाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करत राहील, असा विश्वासही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केला.