spot_img
spot_img
spot_img

मावळच्या फुलशेतीला जागतिक मंचाकडे नेणारा ऐतिहासिक उपक्रम

मुंबई मंत्रालयात आमदार सुनील शेळके यांची जागतिक दर्जाचे अत्याधुनिक कट फ्लॉवर मार्केट उभारणीसंदर्भात सविस्तर बैठक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मावळ तालुक्याच्या फुलशेतीला जागतिक दर्जाची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ व्हावी या उद्देशाने मंत्रालयात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मंत्री मा. श्री. भरत गोगावले यांच्या सोबत आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत मुंबईतील दादर येथे अत्याधुनिक कट फ्लॉवर मार्केट उभारण्याच्या मागणीवर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत मावळातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांचा आमदार सुनील शेळके यांनी मुद्देसूद आढावा घेतला. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, निर्यातीसाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच तांत्रिक मदत आणि जागतिक दर्जाचे मार्केटिंग नेटवर्क निर्माण व्हावे यासाठी त्यांनी ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित केली.

या प्रसंगी आमदार महेश शिंदे,  मनीषाताई चौधरी, कृषी विभागाचे प्रधान सचिव रस्तोगी साहेब, मुंबई महानगरपालिकेच्या मार्केट विभागातील अधिकारी, तसेच दादर कट फ्लॉवर असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

“मावळची फुलशेती ही या भागाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीला जागतिक स्तरावर योग्य न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत,” अशी ठाम भूमिका आमदार सुनील शेळके यांनी या वेळी व्यक्त केली.

या बैठकीनंतर मावळच्या फुलशेतीला नवे आयाम मिळणार असून शेतकऱ्यांसाठी स्थिर, सुरक्षित व जागतिक बाजारपेठेचा मार्ग खुला होणार आहे. मावळचा शेतकरी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!