शबनम न्यूज | प्रतिनिधी
आज अहिल्यानगर मध्ये एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा होणार होती. मात्र आता ही सभा रद्द करण्यात आली आहे. पुढच्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्लिम बहुल असलेल्या मुकुंद नगर येथील त्यांच्या या सभेला अटी व शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. ही सभा रद्द झाली असल्याची माहिती माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. पोलिस अधीक्षक आणि IG यांनी आम्हाला संपर्क केला आहे. यावेळी त्यांनी ही सभा पुढे ढकलण्याची विनंती केल्याची माहिती जलील यांनी दिली. यावर आम्ही देखील सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जलील यांनी दिली.
ते म्हणाले, काल अहिल्यनगरमध्ये जी घटना घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला आहे. आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही. 9 तारखेला आम्ही सभा घेऊ शकतो. कुणी मागणी केल्यामुळे आम्ही सभा रद्द केली असे नाही. अहिल्यनगरमधील शाळेत घडलेला प्रकार हा सुनियोजित होता. प्लॅनिंग करुन सगळं झालेले आहे. यामध्ये कुणाचं षडयंत्र आहे की आम्ही तिथे कुणी येऊ नये याचाही तपास केला पाहिजे. काही राजकीय पक्षांनी मिळून एमआयएम तिथे येऊ नये यासाठी हे सगळं केलं असल्याची माहिती आहे असं जलील म्हणाले.
ए आय एम आय एम चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागात करण्यात आलं होतं.