spot_img
spot_img
spot_img

जागतिक मराठी संमेलन पणजीत – अध्यक्षपदीशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जागतिक स्तरावर पसरलेल्या मराठी गुणवंतांना एकत्र आणणारे आणि गोव्यातील सांस्कृतिक विश्वासाठी ऐतिहासिक ठरणारे “जागतिक मराठी संमेलन- शोध मराठी मनाचा २०२६’ यंदा गोव्याची राजधानी पणजी येथे होणार आहे. जागतिक मराठी अकादमी, गोवा मराठी अकादमी, गोमन्तक साहित्य सेवक मंडळ इन्स्टिट्यूट मिनिझेस ब्रागांझा (आयएमबी) व बिल्वदल परिवार या संस्थांच्या संयुक्त विद्यमान ९ ते ११ जानेवारी २०२६ मध्ये हे संमेलन पार पडणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात शास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. अनिल काकोडकर यांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष व प्रख्यात कवी रामदास फुटाणे यांनी दिली.

यावेळी दशरथ परब, प्रा. अनिल सामंत, प्रा. डॉ. अशोक पाटील, रमेश वंसकर, सागर जावडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संमेलनाची रूपरेषा, कार्यक्रमांचे स्वरूप व अपेक्षित सहभाग याबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

प्रा. अनिल सामंत यांनी या संमेलनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, जागतिक मराठी संमेलनाचे हे २१ वे वर्ष आहे. गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मराठी भाषेला मोलाचे स्थान आहे. गोव्यातील सांस्कृतिक परंपरा आणि मराठी यांचा संगम अधिक दृढ व्हावा, यासाठी हे संमेलन महत्त्वाचे ठरणार आहे. विविध उपक्रम, चर्चासत्रे व वैचारिक मैफलींमुळे मराठीचा विकास अधिक व्यापक प्रमाणावर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संमेलनादरम्यान परिसंवाद, काव्यवाचन, चर्चासत्रे, नाट्यप्रयोग तसेच मराठी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. गोव्यातील विविध संस्था, लेखक, कवी, कलाकार आणि वाचक मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

मराठी उद्योग , कला व संस्कृती यांचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा आणि नवीन पिढीला प्रेरणा मिळावी हा या संमेलनामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. परिणामी गोव्याच्या भूमीवर होणारे हे संमेलन जागतिक मराठी विश्वाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!