spot_img
spot_img
spot_img

भारतीय शल्यविशारदांना ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ अब्स्ट्रॅक्ट’ पुरस्कार प्राप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुंबई : सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES – Society of American Gastrointestinal & Endoscopic Surgeons) परिषदेचे १२ ते १५ मार्च २०२५ या कालावधीत लॉन्ग बीच, लॉस एंजेलिस, अमेरिका येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ अब्स्ट्रॅक्ट’ हा पुरस्कार भारताला मिळाला. हा पुरस्कार मिळणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्यानिमित्ताने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शल्यविशारदांचा सत्कार करुन कौतुक केले.

मंत्रालय येथील वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या दालनात हा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले आदी उपस्थित होते.

सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES) ही एक आघाडीची आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सा संघटना असून, मिनीमल अक्सेस (Minimal Access) व लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसंबंधीचे संघटनेकडून प्रस्थापित प्रोटोकॉल संपूर्ण जगभरात प्रमाण मानले जातात. ही संस्था दरवर्षी शैक्षणिक परिषदांचे आयोजन करते तसेच संशोधन व नाविन्यपूर्ण उपचार पद्धतींना प्रोत्साहन देते. या सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES) २०२५ परिषदेसाठी ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज जी समूह रुग्णालये, मुंबई येथील १३ शस्त्रक्रिया व्हिडिओ सादर करण्यात आले होते. ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (ग्रँट मेडिकल कॉलेज) जगातील या प्रमुख परिषदेतील सर्वाधिक व्हिडिओ सादरीकरण आणि स्वीकृती मिळवण्याचा मान मिळवला आहे, अशी माहिती पुरस्कार प्राप्त डॉ. गिरीश बक्षी यांनी यावेळी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!