मराठवाडा, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना ‘एक हात मदतीचा’..
शबनम न्यूज | प्रतिनिधी
मराठवाडा, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांतील भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा प्राधिकरण येथील जनसंपर्क कार्यालयात साधेपणाने व समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सध्या मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात हजारो कुटुंबांचे हाल होत आहेत. अन्नधान्य, वस्त्र, निवारा, औषधे यांची तीव्र टंचाई भासत आहे. या परिस्थितीत वाढदिवस साजरा करण्याऐवजी अनुप मोरे यांनी समाजहिताचा मार्ग स्वीकारला. अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने “एक हात मदतीचा” या उपक्रमातून पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधे, शालेय साहित्य अशा मदतसामग्रीचा मोठा साठा तयार करून ती सामग्री पुरबाधित भागात रवाना करण्यात आली.
सोहळ्याची सुरुवात आकुर्डीतील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने करण्यात आली. त्यानंतर मातृसेवा सेवाभावी संघातील निराधार ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. त्यांच्या आरोग्याची विचारपूस करत आशीर्वाद घेण्याचा भावनिक क्षणही अनुभवास आला.
समाजहिताच्या दृष्टीने रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आकुर्डी येथील कुटे हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे एकूण ७६ रक्तदात्यांनी रक्तदान करून जीव वाचविण्याच्या कार्यात योगदान दिले. याशिवाय गोमातेचे पूजन व गाईंसाठी चारा वाटप करून पर्यावरण आणि पशुप्रेमाचा संदेशही देण्यात आला.
या विधायक उपक्रमांदरम्यान भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांनी अनुप मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थितांमध्ये भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे,प्राधिकरण मा.अध्यक्ष सदाशिव खाडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, राम वाकडकर, प्रसाद शेट्टी, केशव घोळवे, विनायक गायकवाड, राजू मिसाळ, प्रमोद कुटे, आर एस कुमार, सलीम शिकलगार, राजेंद्र बाबर, विजय शिनकर, अरुण थोरात, अतुल इनामदार, समीर जावळकर, मनोज देशमुख, सचिन कुलकर्णी, यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मिस अर्थ इंडिया २०२५ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोमल चौधरी आणि महाराष्ट्र टेबल टेनिस स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या सानवी मोरे यांचा अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे कार्यक्रमाला वेगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले.
समाजहित, सेवाभाव, पर्यावरणप्रेम आणि क्रीडाप्रेम अशा विविध अंगांनी सजलेल्या या आगळावेगळ्या सोहळ्यामुळे अनुप मोरे यांचा वाढदिवस केवळ एक औपचारिक अभिष्टचिंतन न राहता समाजासाठी प्रेरणादायी संदेश देणारा दिवस ठरला.