spot_img
spot_img
spot_img

ललिता पंचमीनिमित्त ‘स्वरूपवर्धिनी’ला ‘रोटरी’तर्फे ९००० सॅनिटरी नॅपकिन भेट

शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवरात्रोत्सव व ललिता पंचमीच्या निमित्ताने स्वरूपवर्धिनी संस्थेच्या किशोरी विकास प्रकल्पांतर्गत वस्ती भागातील १२० मुलींना रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या वतीने वर्षभर पुरतील, असे ९००० सॅनिटरी नॅपकिनचे भेट देण्यात आले. वयात येणाऱ्या मुलींना मासिक पाळीबाबत जागृतीपर मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.
शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा व पायल तिवारी बिटिया फाउंडेशनच्या संस्थापिका संगीताताई तिवारी, माजी पोलीस अधिकारी भानूप्रताप बर्गे साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. प्रसंगी स्वरूपवर्धिनीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. संजय तांबट, उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन, रोटरी क्लबचे अध्यक्ष जीवराज चोले, संस्थापक सदस्य राजूभाई शहा, सचिव तेजस्विनी थिटे, खजिनदार सचिन तलरेजा, पब्लिक इमेज डायरेक्टर सारिका रोजेकर, सामाजिक कार्यकर्त्या अनुजा पाटील आदी उपस्थित होते.
संगीता तिवारी म्हणाल्या, “मासिक पाळी ही नैसर्गिक बाब असून त्याबाबत समाजात अजूनही गैरसमज, संकोच व अज्ञान आहे. त्यामुळे या विषयावर खुलेपणाने संवाद आवश्यक आहे. मुलींनी याबाबत लाज किंवा भीती बाळगू नये. पालकांनीही मुलींशी संवेदनशीलतेने चर्चा करावी. मुलींनी आरोग्यदायी सवयी अंगीकारत स्वच्छता राखावी.”
भानुप्रताप बर्गे म्हणाले, “मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम स्तुत्य आहेत. स्वसंरक्षणासोबत आरोग्याची निगा राखावी. मासिक पाळीबाबत उघडपणे बोलल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या कमी होऊ शकतात. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे. जिद्द, मेहनत, सचोटीने अभ्यास करून मोठे व्हा.”
‘चांगल्यासाठी एकत्र येऊ’ या उद्देशाने रोटरी क्लब यावर्षी काम करत असून, त्याचाच एक भाग म्हणून मुलींच्या आरोग्यासाठी घेतलेला हा पुढाकार आहे, असे जीवराज चोले यांनी नमूद केले. शिरीष पटवर्धन यांनी स्वरूपवर्धिनीच्या विविध उपक्रमांविषयी सांगितले. विठ्ठल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. संजय तांबट यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!