शबनम न्यूज | प्रतिनिधी
आदिवासी युवकांना उद्योग क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने गोदरेज एंटरप्राईजेस व ऑटोमोटिव्ह स्कील डेव्हलपमेंट कौन्सिल (ASDC) यांच्यासोबत सी.एस.आर. अंतर्गत सामंजस्य करार केला आहे.
हा सामंजस्य करार आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त तथा शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाला.
या कराराअंतर्गत २१० आदिवासी युवकांना मोफत फोर्कलिफ्ट ऑपरेटर व मोटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे युवकांना उद्योग क्षेत्रातील आवश्यक तांत्रिक कौशल्ये, प्रमाणपत्रे व परवाने मिळतील तसेच उद्योगांमध्ये थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी सांगितले.
यावेळी गोदरेज एंटरप्राईजेसचे सी.एस.आर. प्रमुख अश्विनी देवदेशमुख, प्रफुल मोरे, एएसडीसीचे प्रादेशिक प्रमुख आनंद खाडे, स्टेट कोऑर्डिनेटर प्रसाद राठोड, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
युवकांनी एकलव्य कौशल्य योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.