पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: पिंपरी चिंचवड शहरातील मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती परिसरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या परिसरात शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे. रात्री अपरात्री नागरिक जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून जात असतात, त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, भटक्या कुत्र्यांची संख्या तातडीने कमी करण्यासाठी कारवाई करावी, प्रभागात आठवड्यातून किमान तीन वेळा तरी कुत्र्यांना पकडण्यासाठी नियमितपणे गाडी पाठवावी, प्रभागातील नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी विजय जरे यांनी केली आहे. निवेदन देताना विजय जरे यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे, किशोर भंडारी उपस्थित होते.