spot_img
spot_img
spot_img

दिव्यांग सर्वेक्षणासाठी आशा सेविकांना देण्यात आले विशेष प्रशिक्षण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दिव्यांग नागरिकांची अचूक नोंद घेण्यासाठी व्यापक सर्वेक्षण मोहीम महात्मा गांधी सेवा संघ यांच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे. आशा सेविकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच आशा सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली हे प्रशिक्षण निगडी येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात पार पडले. याप्रसंगी समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली ढोणे, महात्मा गांधी सेवा संघाचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर, डॉ. वर्षा गट्टू, डीईआयसी पुणे येथील डॉ. प्रज्ञा गावडे, डॉ. कल्याणी मांडके, दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांच्यासह महापालिकेचा समाज विकास विभाग, दिव्यांग भवन येथील अधिकारी, कर्मचारी तसेच आशा सेविका उपस्थित होत्या.

प्रशिक्षणामध्ये आशा सेविकांना सर्वेक्षणाला गेल्यानंतर दिव्यांग व्यक्तींची ओळख कशी करावी, त्यांच्याशी संवेदनशीलतेने संवाद कसा साधावा, डिजिटल अ‍ॅपच्या मदतीने दिव्यांगाची माहिती कशा पद्धतीने नोंदवावी, याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. दिव्यांग हक्क कायदा २०१६ नुसार केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने स्थानिक स्तरावर दर ५ वर्षांनी दिव्यांगांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. २०१६ च्या कायद्याच्या अगोदर फक्त ७ प्रकारचे दिव्यांगत्व दृष्टिक्षेपात घेतलेले होते. परंतु सद्य परिस्थितीत २०१६ च्या कायद्यानुसार २१ प्रकारचे दिव्यांगत्व निदर्शनास आणलेले आहेत. त्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तींच्या सर्वेक्षणाला गेल्यानंतर त्यांच्या दिव्यांगत्वाचा प्रकार नमूद करण्यासोबतच इतर माहिती कशा पद्धतीने संकलित करण्यात यावी, याची माहितीही यावेळी देण्यात आली.

दिव्यांग व्यक्तींच्या सर्वेक्षणाचा उद्देश केवळ आकडेवारी गोळा करणे हा नसून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडविणे हा आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगापर्यंत शासनाच्या योजना व सुविधा पोहोचतील. समाजातील सर्व घटकांचा विकास होणे महत्त्वाचे असून पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग नागरिकांच्या सशक्तीकरणासाठी असे उपक्रम राबवत आहे.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

शहरातील दिव्यांग नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे. दिव्यांग सर्वेक्षण हा फक्त एक उपक्रम नसून सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे. या सर्वेक्षणामुळे शहरातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला त्यांच्या हक्काच्या सुविधा देणे शक्य होणार आहे. आशा सेविकांच्या सहकार्यामुळे हे उद्दिष्ट साध्य करणे सोपे होईल.

– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करताना त्या अनुषंगाने असणाऱ्या नियमांची माहिती आशा सेविकांना असणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रशिक्षणामध्ये त्यांना माहिती देण्यात आली आहे. सर्वेक्षणाचा हा उपक्रम दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वाची पायरी ठरेल.

– ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!