spot_img
spot_img
spot_img

संगीत नाटकांचा समृद्ध ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे – डॉ. वंदना घांगुर्डे

शबनम न्यूज | प्रतिनिधी
संगीत रंगभूमीला १८२ वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. हा समृद्ध ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री डॉ. वंदना घांगुर्डे यांनी केले .
   पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी, पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग’ या नाट्य महोत्सवात संगीत रंगभूमीवरील विशेष योगदान व मराठी संगीत रंगभूमी या ग्रंथ निर्मितीच्या निमित्ताने डॉ. वंदना घांगुर्डे यांची प्रकट मुलाखत लेखक व निवेदक श्रीकांत चौगुले यांनी घेतली. 
    प्रास्ताविक प्रभाकर पवार, स्वागत संस्थेचे रंगकर्मी सतीश एकार यांनी केले. जेष्ठ रंगकर्मी सुरेश कोकीळ, रमेश वाकनीस आदी उपस्थित होते. 
    यावेळी डॉ. वंदना घांगुर्डे यांनी संगीत रंगभूमी विषयी सांगितले की, संगीत नाटकाचा प्रारंभ विष्णुदास भावे यांच्यापासून झाला असला तरी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल पासून झाला. त्यानंतर नटसम्राट बालगंधर्व, संगीत सूर्य केशवराव भोसले, मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या गायकीने रंगभूमी अधिक समृद्ध झाली. त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी काही पदे सादर केली‌. या तीन महान गायकांचा व त्यांच्या गायन विचारधारांचा रसिकांनी पुरस्कार केला. त्यामुळे पुढे अनेकांनी त्यांचे अनुकरण केले. 
   “संगीत रंगभूमी मुळे दरबारी, रागदारी संगीत सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. ‌त्यासठी अनेक संगीतकारांनी नवनवीन प्रयोग केले. उडत्या चालीचा अंतर्भाव केला. गरबा, लावणी, ठुमरी यांचा वापर केला. संगीत नाटक हे काळानुसार बदलत गेले. तंत्रज्ञानात बदल झाला. तसेच  सामाजिक परिस्थितीनुसार नाटकाच्या विषयातही बदल झाला. सुरुवातीला पौराणिक कथाच फक्त मांडणाऱ्या संगीत नाटकांनी एकच प्याला, कीचकवध, संगीत शारदा अशा विविध नाटकातून स्वातंत्र्य चळवळीला पोषक व सामाजिक सुधारणांचा विचार मांडला.
   स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तीन नाटके लिहिली, संगीत रंगभूमीसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. त्यांचे संन्यस्त खड्ग हे नाटक वेगळ्या धाटणीचे आहे .
    नाटककारांच्या काही आठवणी, घटना, प्रसंग तसेच सुरेल नाट्यपद यामुळे रंगानुभूति: महोत्सवाच्या उत्तररंगातील ही मुलाखत महोत्सवात  सहभागी झालेल्या अभ्यासकांच्या, रसिक श्रोत्यांच्या दृष्टीने अधिक महत्वपुर्ण ठरली. डॉ. वंदना घांगुर्डे यांनी ‘पंचतुंड नररुंड मालधर’ या नांदीने सुरुवात केली आणि ‘शतजन्म शोधताना’ या नाट्यपदाने मुलाखतीची सांगता केली. चिन्मय कुलकर्णी व सार्थक भोसले यांनी संगीत साथ केली.
   सूत्र संचालन मिलिंद बावा, तेजस्विनी गांधी यांनी आणि आभार अमृता ओंबळे यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!