शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील बिजलीनगर येथे धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांबरोबर जुगार खेळण्याच्या वादातून एका युवकाचा भरदिवसा खून करण्यात आला. बिलीनगर येथील नागसेन नगर झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या वैभव थोरात (वय २५) याचा जुगाराच्या वादातून त्याच्याच चार मित्रांनी मिळून त्याचा खून केला. वैभव थोरात याचा जागीच मृत्यू झाला असून चारही संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.२२) सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता बिजलीनगर आकुर्डी येथे आकुर्डी रेल्वे स्टेशन शेजारी असलेल्या नागसेन नगर झोपडपट्टीमध्ये वैभव थोरात व त्याच्या ओळखीचे चार जण अनिल बनसोडे, महेश कोळी, शिवम वाळुंखे, योगेश गायकवाड हे सर्वजण जुगार खेळत होते. काही वेळानंतर जुगार खेळण्याच्या वादातून त्यांच्यामध्ये भांडणे सुरू झाली आणि याच भांडणातून वैभव थोरात यांच्यावर या चौघांनी धारदार शस्त्राने वार केले.
या घटनेत वैभवचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती मिळताच चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि चारही संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर करत आहेत.