शबनम न्यूज | प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश सांगोळेकर लिखित आणि बंधुता प्रकाशन प्रकाशित ‘विश्वबंधुतेची प्रकाशवाट’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आयोजिला आहे. गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात हा प्रकाशन सोहळा होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते, तर ज्येष्ठ समाजनिष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमावेळी स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्रा. शंकर आथरे, संगीता झिंजुरके यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती प्रकाशक मंदाकिनी रोकडे यांनी दिली.
बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी पाच दशकांहून अधिक काळ बंधुता, राष्ट्रबंधुता आणि विश्वबंधुता या तीन टप्प्यांवर केलेल्या यशदायी आणि प्रेरणादायी कार्याचे दस्तावेजीकरण म्हणजे हे पुस्तक आहे. डॉ. सांगोलेकर यांच्यासह प्राचार्य राम शेवाळकर, डॉ. निर्मलकुमार फडकुले, डॉ. रावसाहेब कसबे फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अॅड. भास्करराव आव्हाड, डॉ. अश्विनी धोंगडे, पत्रकार जीवराज चोले, प्रा. शंकर आथरे, नानासाहेब लडकत आणि बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या लेखनाचा यामध्ये अंतर्भाव असल्याचे मंदाकिनी रोकडे यांनी नमूद केले.