शबनम न्यूज | प्रतिनिधी
फिजिओथेरपी, नर्सिंग, फार्मसी, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आणि इंटेरियर डिझाईनसह अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान व अनुभव मिळावा, यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ‘सूर्यदत्त धन्वंतरी हॉस्पिटल’ (मॉक रुग्णालय-स्किल लॅब) हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमधील बन्सी-रत्न सभागृहात प्रतिकात्मक रुग्णालय (मॉक हॉस्पिटल) उभारण्यात येणार आहे. सूर्यदत्त मल्टी डिसीप्लिनरी इंटिग्रेटेड कॅम्पस संकल्पनेंतर्गत हा उपक्रम होत आहे. यापुढे दरवर्षी हा वार्षिक उपक्रम होणार आहे.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दि. २२ सप्टेंबर ते बुधवार, दि. २४ सप्टेंबर २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत हे प्रतीकात्मक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात विद्यार्थी डॉक्टर, नर्स, औषध विक्रेते व रुग्णालयाशी संबंधित विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत अनुभव घेणार आहेत. विद्यार्थ्यांनी वर्गात किंवा पुस्तकांतून मिळवलेले वैद्यकीय व आरोग्यशास्त्रीय ज्ञान प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या अनुकरणात्मक रुग्णालय प्रकल्पाद्वारे त्यांना प्रायोगिक अनुभव मिळणार असून, त्यांना रुग्णालयीन कामकाजाची वास्तव जाण मिळेल आणि भावी आरोग्यसेवा व्यावसायिकांना सक्षम, संवेदनशील व उद्यमशील नेते म्हणून विकसित होण्यात हे व्यासपीठ उपयुक्त ठरेल.
या प्रतीकात्मक रुग्णालयामध्ये विविध ओपीडी, आयपीडी, आयसीयू, रेडिओडायग्नोसिस, मेडिकल अशा क्लिनिकल विभागांमधील कामकाजाचे प्रशिक्षण मिळेल. यासोबतच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे सराव, बेसिक लाईफ सपोर्टची प्रात्यक्षिके, मॉक ड्रिल्स यांचे आयोजन, हॉस्पिटल रेकॉर्ड्स, बिलिंग, डिस्चार्ज समरी अशा प्रशासनिक प्रक्रियांचाही विद्यार्थ्यांना अनुभव घेता येणार आहे. आरोग्य जनजागृती स्टॉल्स, पोस्टर्स आणि संवादात्मक उपक्रमांद्वारे सर्वसामान्यांनाही आरोग्यविषयक माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. भविष्यात मुलांना प्रात्यक्षिक अनुभव घेता येण्याच्या दृष्टीने ‘सूर्यदत्त’चे खरोखरीचे रुग्णालय सुरु करण्याचा मानस प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केला.
या तीन दिवसीय उपक्रमाचे उद्घाटन सोमवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी पुण्यातील विविध रुग्णालयांतील ३० डॉक्टरांना, आरोग्यसेवक आणि औषधनिर्माण क्षेत्रातील मान्यवरांना ‘सूर्यदत्त धन्वंतरी हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा उपक्रम सर्व विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी रुग्ण शिक्षण आणि आरोग्य जनजागृती उपक्रमांवर विशेष भर देण्यात येणार आहे. उपक्रमाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २४) रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
उपक्रमाविषयी बोलताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “या उपक्रमातून विद्यार्थ्यांना रुग्ण हाताळणीसाठी आत्मविश्वास वाढेल. कौशल्य वृद्धिंगत होऊन विविध आरोग्य शाखांतील समन्वय सुधारेल. तसेच रुग्णालयीन कामकाज व प्रशासनिक प्रक्रिया यांचे सखोल आकलन होईल. या उपक्रमामध्ये सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंग पॅरामेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्च, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजी तसेच सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम या संस्थांचा सक्रीय सहभाग आहे.”
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी डॉ. सीमी रेठरेकर (९७६५५५१३२१) किंवा नयना गोडांबे (७७७६०७२०००) यांच्याशी संपर्क साधावा. ‘सूर्यदत्त’ परिवारातील शालेय विभागापासून ते पीएचडीपर्यंत सर्वच विभागातील विद्यार्थी, शिक्षक, पालक या उपक्रमाला भेट देऊन हा अनोखा अनुभव घेणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील या अनोखा व अभिनव उपक्रमाचा अनुभव घेण्यासाठी वैद्यकीय व औषधनिर्माण क्षेत्रात रुची असलेल्या पुणेकरांनी भेट द्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.