spot_img
spot_img
spot_img

युवकांनी विद्यार्थीदशेतच करिअरचे ध्येय निश्चित करावे – डॉ. पराग काळकर.

शबनम न्यूज | प्रतिनिधी

युवकांनी विद्यार्थीदशेत असतानाच करिअरचे ध्येय निश्चित करून ध्येयप्राप्तीचे नियोजन काटेकोरपणे करावे करायला हवे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी व्यक्त केले. चिंचवड येथे यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स ( आयआयएमएस) व इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयबीएमआर) या दोन्ही संस्थांच्या एमबीए व एमसीए विद्याशाखेतील विद्यार्थ्यांच्या यशोप्रवेश कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.कार्यक्रमाची  सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वतीप्रतिमापूजन  व सामूहिक  राष्ट्ट्रगीताने  करण्यात  आली.         

यावेळी बोलताना डॉ. पराग काळकर  पुढे म्हणाले की,एमबीए व एमसीए अभ्यासक्रमाच्या दोन वर्षांच्या शैक्षणिक कालावधीच्या पहिल्या  दिवसापासूनच आपल्या  करिअरच्या वाटचालीचा संभाव्य आराखडा तयार करावा, यामध्ये  नेमक्या  कोणत्या  कंपनीत, नेमक्या  कोणत्या हुद्द्यावर आणि नेमक्या  किती पगाराची  संधी आपल्याला  मिळायला  हवी याचे हंगामी नियोजन सर्व विद्यार्थ्यानी करायला हवे असे आवाहन डॉ. पराग काळकर यांनी केले. जसे एखादा नवीन गिर्यारोहक सुरुवातीला  छोट्या  छोट्या टेकड्या, डोंगर सर करण्याचा सराव करतो, त्याप्रमाणेच विध्यार्थ्यानी देखील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर मॅनेजरच्या पदाच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आजपासूनच आपण आपल्या दैनंदिन  जीवनात एखाद्या मॅनेजर प्रमाणे आपली दिनचर्या कशी करू  शकतो याबाबत  प्रयत्नशील  व्हायला हवे.तसेच आपले वेळेचे व्यवस्थापन, आपल्या कर्तव्याबद्दल, आपल्याला नेमून दिलेल्या  कामाबद्दलची आपली निष्ठा,आपल्या वर्तणुकीत योग्य  बदल करत आपल्या ध्येय प्राप्तीसाठी सातत्यपूर्ण कार्यरत राहणे आवश्यक  हवे,असे डॉ. काळकर  यांनी सांगितले. 

याशिवाय समाजमाध्यमांचा मर्यादित वापर करत केवळ परीक्षेत उत्तीर्ण  होण्यासाठी अभ्यास  न करता शिकलेल्या अभ्यासाचा आपल्याला प्रत्यक्षात वापर कसा करता येईल यादृष्टीने विचार करा असे सांगून  काही उदाहरणांचे दाखले देत  डॉ. काळकर यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन  केले. 

यावेळी बायोरॅड  मेडीसीस कंपनीचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकारी डॉ.उज्जल भट्टाचार्जी यांनीही  त्यांच्या  मनोगतात  विद्यार्थ्यांना समर्पण आणि आत्मविश्वास अंगीकारून  इतरांशी  तुलना  न करता  फक्त स्वतःशी स्पर्धा करावी असे सांगत विविध प्रेरणादायी  व्यक्तिमत्त्वांच्या जीवनचरित्राची उदाहरणे सांगून  मार्गदर्शन  केले. 

तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी त्यांच्या  मनोगतात सध्याच्या युवा पिढीला आधुनिक तंत्रज्ञान सहजगत्या उपलब्ध  असण्याचे  वरदान लाभले असून त्याचा योग्य वापर करून आपले व्यक्तिमत्त्व  अधिकाधिक गुणसंपन्न  करण्याचा  प्रयत्न  करायला हवा तसेच आपली विचार प्रक्रिया, सारासार विवेक आणि विविध कौशल्ये  विकसित  करायला  हवी असे सांगितले.

कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात डॉ. मीनल राव, वरिष्ठ  मनुष्यबळ  व्यवस्थापिका थरमॅक्स कंपनी,

मनोजकुमार  चौधरी, सॅप  डिलिव्हरी मॅनेजर व आयबीएम  प्रशिक्षक,डॉ. हॅरोल्ड डिकॉस्टा,अध्यक्ष सायबर सिक्युरिटी कोऑपरेशन. ऍड. सीमा शर्मा,पॉश  कायदेतज्ज्ञ., प्राची सोनचल, प्रमुख  मनुष्यबळ  व्यवस्थापिका बर्कहार्ट कॉम्प्रेशन होल्डिंग.  एनएलपी  प्रशिक्षक अनुपमा मिश्रा यांनीही  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

तर समारोप सत्रात  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शंतनूराव किर्लोस्कर अध्यासनाचे प्रा. डॉ. कॅप्टन सी. एम. चितळे यांनी  त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातील विविध उदाहरणे सांगत  विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन  केले. 

या कार्यक्रमाला आयआयएमएसचे संचालक  डॉ. शिवाजी मुंढे  यांनी विद्यार्थ्यांना  संस्थेतील  विविध उपक्रमांची  सविस्तर  माहिती  सांगितली. तर तृप्ती पाटील यांनी  यशस्वी संस्थेच्या  कार्यविस्ताराबद्दल सादरीकरण  केले.  या प्रसंगी  आयबीएमआरचे संचालक डॉ. बाळासाहेब  शिवळे यांच्यासह आयआयएमएस व आयबीएमआरचे सर्व प्राध्यापक, विभाग प्रमुख यांच्यासह  विद्यार्थी विद्यार्थिनी  उपस्थित  होते. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन नताशा दलाल, कोमल  गौड,रिया मिरजकर, सेजल गायकवाड  या विद्यार्थिनींनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. वंदना  मोहंती  यांनी  केले.     

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!