शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) च्या दुसऱ्या टप्प्यातील अंमलबजावणी करतांना जागतिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. देशांतर्गत तसेच जगाच्या बाजारपेठेत शेतमालाला स्पर्धात्मक दर मिळण्यासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतमालाचे प्रभावी मूल्यवर्धन साखळी तयार करा. नागरिकांच्या जीवनमानात परिवर्तन करणारा प्रकल्प असून बियाण्यापासून ते उत्पादन आणि त्याच्या विक्रीपर्यंत कृती आराखडा तयार करावा,असे निर्देश राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
आशियाई विकास बँक अर्थ सहाय्यीत महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प १ आढावा आणि टप्पा क्रमांक २ च्या नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, कृषी पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, नाबार्डचे उपमहाप्रबंधक हेमंत कुंभारे आदी उपस्थित होते.
पणन मंत्री रावल म्हणाले, राज्यातील डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरु, चिकु, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची, आंबा, काजू, लिंबू व पडवळ आणि द्राक्ष, पपई, हळद, आले, अंजीर, शेवगा, टोमॅटो या फलोत्पादन पिकांच्या व फुलांच्या मुल्यसाखळ्यांमध्ये खाजगी गुंतवणूक आकर्षित करुन शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ करावी. फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे व स्पर्धात्मक दर मिळवण्यासाठी शितगृहाची साठवणूक क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. उत्पादन काढणीनंतर साठवणुकीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा.
शेतकरी उत्पादक संस्थांचा मुल्य साखळी गुंतवणूकदार व सहभागी घटकांची संस्थात्मक क्षमता वाढ करण्यास प्राधान्य देण्यात यावे. शाश्वतता आणि हवामान अनुकूल व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठ व निर्याताभिमुख शेती व्यवसायाचा विकास करावा. जागतिक मागणीनुसार निर्यात सुविधा केंद्रे विकसित करावेत. विभागीयस्तरावर प्रयोगशाळा निर्माण केल्या पाहिजे.
शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाचे मूल्यवर्धन करुन जलद पुरवठा साखळीच्या माध्यमातून देशासोबतच जागतिक बाजारपेठेत शेतमाल स्पर्धात्मक दरात विकला जाईल या करिता सुविधा विकसित करण्याचे नियोजन करावे. शेतमालाची नासाडी टाळून तो अधिक काळ टिकला पाहिजे, यादृष्टीने कार्यवाही करावी. काढणी पश्चात, वर्गीकरण, प्रतवारी (ग्रेडींग), पॅकेजिंग, मालाचे मूल्यवर्धन, साठवणूक ही साखळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सक्षम करावी.
ते पुढे म्हणाले, राज्यात उच्च तंत्रज्ञानयुक्त रोपवाटीकांची निर्मिती करून त्यामध्ये फळपिकांचे दर्जेदार रोपे तयार करावी. याद्वारे उच्च दर्जाच्या आणि निर्यातक्षम कृषी उत्पादनाची वाढ होण्यास मदत होईल. मॅग्नेट प्रकल्पामध्ये सौर उर्जा आधारित शीतगृह, सोलर कंडक्शन ड्रायर, ट्रककरिता रिचार्जेबल रिफर कंटेनर, बायोमास आधारित शीतगृह
माती परिक्षण यंत्र, माहिती तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल शेती सल्ला, ड्रोनद्वारे रसायनांची फवारनी , मिनी ऑप्टीकल ग्रेडर, उपग्रहआधारित शेती सल्ला, सीताफळ पल्प यंत्र, बाष्पोर्जन आधारित कुल चेंबर, सौर कीटक सापळा अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निवड करून वापर करावा, असेही श्री. रावल म्हणाले.
बैठकीत श्री. कोकरे यांनी आशियाई विकास बँक अर्थसायि्यत महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प १ आढावा आणि टप्पा क्रमांक २ च्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.