शबनम न्यूज | प्रतिनिधी
तळेगाव एमआयडीसीतील मिंडेवाडी परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकारात दोन मित्रांनी केलेली पिस्तुलाची स्टंटबाजी जीवघेणी ठरली. या घटनेत विजयकुमार (वय २८) हा कामगार गंभीर जखमी झाला असून सध्या सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. पिस्तूल हाताळणारा त्याचा मित्र मंजरिन रजिफ मिया (वय २४) पोलिसांच्या ताब्यात असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनेत जखमी आणि आरोपी हे दोघेही एका खाजगी कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारे मजूर असून मिंडेवाडी येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत राहतात. शनिवारी (दि. १३) रात्री साडेसातच्या सुमारास दोघे कामावरून घरी परतत असताना मंजरिनने झुडपांत लपवलेली विनापरवाना पिस्तूल बाहेर काढली आणि हातात फिरवत स्टंटबाजी सुरू केली. अचानक ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटून मोबाइलवर बोलत चाललेल्या विजयकुमारच्या पोटात घुसली.
गोळी लागल्यानंतर सुरुवातीला या दोघांनी खरे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. मित्रांच्या मदतीने जखमीला खोलीवर नेले आणि नंतर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान परिसरात गोळीबाराचा आवाज झाल्याची चर्चा सुरू झाली आणि पोलिसांना माहिती मिळाली. घटनेची चौकशी करताना आरोपी मंजरिनने दोन इसमांनी दुचाकीवरून येऊन आमच्यावर गोळीबार करत लूट केली अशी खोटी गोष्ट रचसी. परंतु पोलिसांनी केलेल्या कडक चौकशीनंतर त्याने कबुली दिली आणि पिस्तूल रस्त्यालगत गवतात लपवले असल्याची माहिती दिली.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मंजरिनविरुद्ध विनापरवाना शस्त्र बाळगणे आणि निष्काळजीपणाने गोळीबार करून जखमी करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (दि. १४) सकाळी त्याला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.