spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १४१ शाळांमध्ये आफ्टर-स्कूल मॉडेलची सुरुवात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेचा शिक्षण विभाग व ‘दि अप्रेंटिस प्रोजेक्ट’ (TAP) यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे आफ्टर-स्कूल मॉडेलचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, कॅपजेमिनी इंडियाचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट प्रसाद शेटये, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रतिनिधी राजश्री तिटकारे, संस्थेचे सहसंस्थापक प्रशांत कुमार, अनामिका मुखर्जी, दिनेश साळवे, जुही शहा यांच्यासह १४१ शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

‘दि अप्रेंटिस प्रोजेक्ट’ या उपक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या १४१ शाळांमध्ये २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी आफ्टर-स्कूल मॉडेलची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिंतनशीलता, सहकार्य आणि संवाद कौशल्ये विकसित करणे असून विद्यार्थ्यांना फक्त परीक्षांसाठीच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीवर भर दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कला, कोडिंग, तंत्रज्ञान, आर्थिक साक्षरता यांसारख्या जीवनावश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार असून त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जाणार आहे. त्याच अनुषंगाने अंकुशराव लांडगे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये शिक्षकांना उपक्रमाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, अभ्यासक्रम, विद्यार्थी व शिक्षक नोंदणी प्रक्रिया तसेच मुख्याध्यापक आणि नोडल अधिकाऱ्यांची जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानासोबतच कला, कोडिंग, तंत्रज्ञान आणि आर्थिक साक्षरता यांसारखी कौशल्ये अत्यावश्यक आहेत. ‘दि अप्रेंटिस प्रोजेक्ट’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास वाढेल.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

‘दि अप्रेंटिस प्रोजेक्ट’ हा उपक्रम सार्वजनिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्याचे एक मोठे पाऊल आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण आणि आफ्टर-स्कूल अनुभव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना देईल.
– किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!