spot_img
spot_img
spot_img

रयत शिक्षण संस्थेच्या विसापूर विद्यालयात ‘बीएआय’मार्फत अद्ययावत स्वच्छतागृहाचे लोकार्पण

शबनम न्यूज | प्रतिनिधी
“कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गावखेड्यातील गरीब, गरजू मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली केली. रयत शिक्षण संस्थेतून लाखो माणसे घडली. त्यांच्या विचारांचा, संस्कारांचा वारसा घेऊन काम करणाऱ्या संस्थांसोबत काम करण्याचे समाधान आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचा उपक्रम स्तुत्य आहे,” असे मत बी. जी. शिर्के ग्रुप ऑफ कंपनीजचे उपाध्यक्ष व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) माजी अध्यक्ष आर. बी. सूर्यवंशी यांनी केले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) माध्यमातून आर. बी. सूर्यवंशी यांच्या देणगीतून रयत शिक्षण संस्थेच्या विसापूर (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उभारण्यात आलेलय अद्ययावत स्वच्छतागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात सूर्यवंशी बोलत होते. प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बाबासाहेब भोस, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, ‘बीएआय’ महाराष्ट्राचे चेअरमन जगन्नाथ जाधव, सचिव मनोज देशमुख, ‘बीएआय’ पुणे सेंटरचे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष राजाराम हजारे व महेश मायदेव, स्वच्छतागृह प्रकल्प संयोजक शशिकांत किल्लेदारपाटील, माजी अध्यक्ष सुनील मते यांच्यासह ‘बीएआय’चे अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी बी. जी. शिर्के समूहातर्फे शाळेला दिलेल्या संगणक कक्षाचे उद्घाटन झाले. तसेच विद्यार्थ्यांना बीएआय पुणे सेंटरतर्फे डायरीचे वाटप करण्यात आले.
आर. बी. सूर्यवंशी म्हणाले, “कर्मवीर भाऊरावांचे, रयत शिक्षण संस्थेचे कार्य जवळून पाहिले आहे. स्वच्छतागृहांअभावी ग्रामीण भागात काही मुली शाळेत जात नाहीत. त्यांच्या शिक्षणात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन २०१३ पासून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून आजवर १८ ठिकाणी शाळांमध्ये अद्ययावत स्वच्छतागृहे बांधून दिली आहेत. याचा हजारो मुलींना लाभ होत आहे. हे कार्य यापुढेही असेच चालू राहील.” बाबासाहेब भोस यांनी स्वागत प्रास्ताविक केले. अजय गुजर यांनी ‘बीएआय’च्या सामाजिक उपक्रमांविषयी सांगितले. 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!