spot_img
spot_img
spot_img

आरोग्य निरीक्षकांसाठी दहा दिवसीय पायाभूत प्रशिक्षणाला सुरुवात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील नवनियुक्त आरोग्य निरीक्षकांसाठी दहा दिवसीय पायाभूत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट व वेस्ट मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात होत आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन उपायुक्त सचिन पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक द. गा. मोरे, स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम प्रमुख डॉ. हरिश रसानकर यांच्यासह महापालिकेच्या सर्व ८ क्षेत्रीय कार्यालयांतील आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

उपायुक्त सचिन पवार यावेळी म्हणाले की, ‘प्रत्येक आरोग्य निरीक्षकाला घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६, प्रथमोपचार, माहितीचा अधिकार, महाराष्ट्र नागरिक सेवा तसेच कायदेविषयक बाबींचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. या सर्व विषयांची उजळणी करून काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या दृष्टीने पायाभूत प्रशिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरतो.’

आरोग्य निरीक्षकांची भूमिका स्पष्ट करताना द.गा. मोरे यांनी सांगितले की, ‘आरोग्य निरीक्षक हा प्रशासन व नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा असून समाजाचा कणा आहे. नागरिकांच्या समस्या सोडवून सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.’

यावेळी डॉ. हरिश रसानकर यांनी आरोग्यविषयक सेवा, आरोग्य संवर्धन, उपचार पद्धती यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. अशा प्रशिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य निरीक्षकांच्या कार्यकुशलतेत वाढ होऊन नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे मतही या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रशिक्षकांनी व्यक्त केले. तसेच दहा दिवसीय प्रशिक्षणामध्ये कोणकोणत्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे, याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रशिक्षणामध्ये सखोल मार्गदर्शन केले जाणारे विषय :

– आरोग्य प्रशासन

– जन्ममृत्यू अधिनियम

– महापालिका अधिनियम १९४९ व त्याअंतर्गत अधिकार

– महापालिकेची रचना व विभागांचे कार्य

– नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम

– नॅशनल न्यूट्रिशन प्रोग्राम

– माहितीचा अधिकार

– महाराष्ट्र नागरिक सेवा

– आरोग्य आजार व प्रथमोपचार

– घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६

– टिपणी लेखन व पत्रलेखन

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!