spot_img
spot_img
spot_img

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडून भीमा कोरेगावमधील विजयस्तंभाला अभिवादन

तुळापूर वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचेही घेतले दर्शन

पुणे, दि. ३१ : नवनिर्वाचित विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोमवारी (ता. ३१) भीमा कोरेगाव येथील विजय स्मृतीस्तंभाला अभिवादन केले. सोबतच वढू बुद्रुक ( ता. शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे, कवी कलश समाधी व गोविंद गोपाळ यांचे बनसोडे यांनी दर्शन घेतले. संभाजी महाराज यांची ३३६ वी पुण्यतिथी तीन दिवसांपूर्वी झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले होते. सोमवारी अण्णा बनसोडे यांनी शंभूंच्या समाधीचे दर्शन घेत वढू बुद्रुक ग्रामपंचायतीचे पांडुरंग गायकवाड यांच्या घरी भेट दिली.

यावेळी सरपंच तुळापूर गुंफा इंगळे, सरपंच वढू बुद्रूक माऊली भंडारे, कोरेगांव भीमाचे संरपंच संदीप ढेरंगे, माजी सरपंच अंकुश शिवले,विजय गव्हाणे, माजी उपसरपंच रमाकांत शिवले,संतोष शिवले, सतीश लांडगे, नाना काटे, संजय अवसरमल, शशी घुले, निलेश पंढरकर, आशिष लांडगे, दातीर पाटील, लाला तांबे, तानाजी वडवे, कृष्णा अरगडे, ग्रामविकास अधिकारी बिबवे, रतन दवणे, सदानंद फडतरे, रविंद्र शिंदे व शंभू भक्त यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी भीमा कोरेगाव ते पिंपळे जगताप रस्ता करण्याबाबत आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यासह ग्रामस्थांनी उपाध्यक्ष बनसोडे यांना दिले. सोबतच, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीनेही संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीदिनी शासकीय सुट्टी देण्यासोबतच पुण्यतिथीच्या दिवशी हेलिकॉप्टरद्वारे शासनाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, उत्तम भंडारे, संजय भंडारे, अनिल भंडारे, सचिन भंडारे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांची मागील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेचे उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मुंबईतील कामकाज आटोपून बनसोडे शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. शहरातील विविध भागातील त्यांच्या समर्थकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. तसेच शनिवारी रात्री पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या वतीने बनसोडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. रविवारी गुढीपाडव्या दिनी ते आपल्या निवासस्थानी होते. सोमवारी दुपारी १२ वाजता बनसोडे यांनी तुळापूर वढू येथील संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. यानंतर तेथीलच भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन केले.

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी लाखो आंबेडकर अनुयायी हजेरी लावतात. हा स्तंभ १८१८ मध्ये झालेल्या भीमा कोरेगावच्या लढाईत दलितांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांकडून उभारण्यात आला होता. भारतीय स्वातंत्र्यापर्यंत महार रेजिमेंटच्या शिखरावर हे स्तंभ चित्रित होते. दलित लोक भीमा-कोरेगावच्या लढाईतील विजयाला पेशव्यांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध महारांचा विजय मानतात. भीमा कोरेगावच्या लढाईला भारतातील अनुसूचित जातींमध्ये एक पौराणिक दर्जा प्राप्त झाला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!