spot_img
spot_img
spot_img

विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणाकरिता शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर – अजित पवार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थेत सुमारे दीड लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी परिसरात अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीच्या आराखड्यातील वर्गखोल्यांचा आकार वाढविण्यासाठी आवश्यक तेवढा अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

शारदानगर माळेगाव कॉलनी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारत बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता जितेंद्र मेमाणे, गटविकास अधिकारी किशोर माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, माळेगाव परिसर हा शैक्षणिक संस्थांचा केंद्रबिंदू असून येथे शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. तसेच शहराच्या पार्श्वभूमीवर या परिसरात रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

बारामती तालुक्यात शिक्षणाची उत्तम सोय उपलब्ध करून दिल्यामुळे राज्याच्या विविध भागांतून येथे विद्यार्थी शिक्षणाकरिता येत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या अधिकाराप्रमाणे शिक्षण मिळावे यासाठी शासन व स्थानिक संस्था सातत्याने प्रयत्नशील आहेत, असेही ते म्हणाले.

नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. वाहन चालवताना वेग मर्यादेत ठेवणे आवश्यक आहे. वाहनचालकांसह सर्वांनी वाहतूक शिस्त पाळावी, असे त्यांनी नमूद केले.

नूतन इमारतीचा आराखडा

शाळेचे एकूण क्षेत्रफळ ९ हजार १६३ चौरस फूट असून यामध्ये मुख्याध्यापक व शिक्षक कक्ष, ९ वर्गखोल्या, २ संगणक प्रयोगशाळा, भोजनालय, मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालये, मंच, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प, सुरक्षा रक्षक कक्ष, वाहनतळ, क्रीडांगण, भांडारकक्ष, पाणी टाकी आणि सोलार सुविधा अशा आधुनिक सोयी उभारण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २ कोटी ६१ लाख ८८ हजार रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे.

या प्रसंगी बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कल्याण पाचांगणे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष केशव जगताप यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!