शबनम न्यूज | प्रतिनिधी
युवा संतूरवादक डाॅ. शंतनु गोखले यांचे प्रभावी वादन आणि ज्येष्ठ सनईवादक पं. शैलेश भागवत यांचे परिपक्व वादन, असा दुहेरी स्वरयोग रसिकांनी गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिरात अनुभवला. पुणे फेस्टिव्हल अंतर्गत ‘जुगलबंदी’ मैफिलीच्या निमित्ताने अभिजात भारतीय संगीताची श्रीमंती पुन्हा अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली.
पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डाॅ. शंतनु गोखले यांच्या संतूरवादनाने पूर्वार्धात रंग भरले. गणेशोत्सवाचे उत्साही वातावरण लक्षात घेऊन डॉ. शंतनु यांनी वादनाचा आरंभ ‘एकदंताय वक्रतुंडाय श्रीगणेशाय धीमहि’ या लोकप्रिय भक्तीरचनेच्या सादरीकरणाने केला. त्यानंतर गुरू पं. शिवकुमार शर्मा यांचे आवडते संगीतकार मदनमोहन आणि ओ. पी. नय्यर यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून ‘लग जा गले’, ‘दिवाना हुवा बादल’ या गाजलेल्या गीतांचा मिडले सादर केला. संगीतकार शिव हरी यांची ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुवे’ ही रचनाही त्यांनी ऐकवली. त्यानंतर डॉ. शंतनु यांनी राग बागेश्री सादर केला. मोजक्या वेळात आलाप, जोड करून त्यांनी झपताल आणि त्रितालातील रचना पेश केल्या. पं. रामदास पळसुले यांचे शिष्य हेमंत जोशी यांनी त्यांना अनुरूप तबलासाथ केली.
पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डाॅ. सतीश देसाई, तसेच सचिन साळुंके यांनी कलाकारांचा सत्कार केला. समन्वयक मोहन टिल्लू यांनी कलाकारांचा परिचय करून दिला आणि सूत्रसंचालन केले.
उत्तरार्धात प्रसिद्ध सनईवादक पं. शैलेश भागवत यांच्या सनई वादनाचा आनंद रसिकांनी घेतला. गायकी अंगाने वादन हे त्यांच्या वादनाचे वैशिष्ट्य होते. पं. भागवत यांनी वादनाची सुरुवात राग श्यामकल्याणने केली. रागवाचक आलाप, जोड…या पद्धतीने त्यांनी बढत केली. एकतालातील आणि त्रितालातील रचना त्यांनी या रागात सादर केल्या. यानंतर रसिकाग्रहास्तव त्यांनी ‘गूॅज उठी शहनाई’ या चित्रपटातील ‘तेरे सूर और मेरे गीत’ हे गीत पेश केले. त्यानंतर मालकंस रागात आडा चौतालात आणि त्रितालात त्यांनी गत वाजवून अनोखी वातावरण निर्मिती साधली. ठुमरी धून दादरा तालात सादर करून त्रितालातील भैरवी धूनने त्यांनी वादनाची सांगता केली.
त्यांना पं. विनायक गुरव यांनी तबल्याची पूरक साथ केली. अभिजीत जाधव, सुरेश डोळसे यांनी सनईसाथ केली. सूर सनईची साथ चंद्रशेखर परांजपे यांनी तर हार्मोनियमची साथ डाॅ. उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी केली. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका अभिनेत्री मधुवंती दांडेकर यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती. अतुल गोंजारी व श्रीकांत कांबळे यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थापन पाहिले.