शबनम न्यूज | प्रतिनिधी
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने २०२५ या वर्षासाठी जाहीर झालेल्या प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (आयआयआरएफ) राष्ट्रीय स्तरावर २७ वा, महाराष्ट्रात सहावा आणि पश्चिम विभागात आठवा क्रमांक पटकावला आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा संजय चोरडिया यांनी प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर, सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
देशभरात प्रतिष्ठा, पारदर्शकता आणि कॉर्पोरेट मान्यतेसाठी ओळखली जाणारी ‘आयआयआरएफ’ची क्रमवारी ही तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्फत विश्लेषण करून अधिकृत व वैविध्यपूर्ण अशा पद्धतीने जाहीर होते, जी उद्योग जगताकडूनही स्वीकारली जाते. रोजगार, अध्यापन-अध्ययन व स्रोत, संशोधन, औद्योगिक उत्पन्न व एकीकरण, प्लेसमेंट धोरण व सहकार्य, भविष्यवेधी मार्गदर्शन आणि बाह्यधारणा व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या सात निकषांवर सर्वेक्षण करून ही क्रमवारी तयार केली जाते. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स ही आरोग्य व संबंधित क्षेत्रातील नामवंत शिक्षणसंस्था आहे.
सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा पूर्णवेळ, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड व्होकेशनल एज्युकेशन एक्झाम (एमएसबीव्हीईई) संलग्नित फिजिओथेरपी पदविका, नॅचरोथेरपी पदविका, नर्सिंग केअर प्रमाणपत्र अभ्यासक्रम, डेंटल असिस्टंट, ऑप्थाल्मिक टेक्निशियन हे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. संवादात्मक, प्रात्यक्षिक, सहकार्यभावना व संकल्पनाधारित अशा अभिनव पद्धतींनी येथे अध्यापन केले जाते. योग, ध्यान, व्यक्तिमत्व विकास, सॉफ्ट स्किल्स, परदेशी भाषा, इनोव्हेशन व इन्क्युबेशन, कॉग्निटिव्ह लर्निंग अशा मूल्याधिष्ठित उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. समाजाला उपयुक्त असे मनुष्यबळ विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन उपलब्ध केले जाते.
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसने शाश्वत, कृष्णा, रांका, देवयानी, सुभोध, औंध इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नित्यानंद इन्स्टिट्यूट अशा नामांकित मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल्सशी करार केले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज रुग्णांसोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळते. मस्क्युलोस्केलेटल, न्यूरोलॉजिकल, पेडियाट्रिक व कार्डिओ-पल्मोनरी फिजिओथेरपी अशा विविध शाखांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय, पानशेत येथील जनसेवा फाउंडेशनमार्फत ग्रामीण व ज्येष्ठ नागरिक आरोग्यसेवेत योगदान, अभय प्रभवना व फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी अँड कल्चरद्वारे सांस्कृतिक व नैतिक शिक्षण, आर्टिफिशियल लिम्ब सेंटर पुणे येथे प्रगत कृत्रिम अवयव पुनर्वसन व मुंबईतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन येथे आंतरशाखीय प्रशिक्षण मिळते. ऑस्टिओपॅथी, नेचरोपॅथी, न्यूट्रिशन, अॅक्युपंक्चर व अॅक्युप्रेशर यांसारख्या कार्यशाळाही आयोजित केल्या जातात.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यासाठी विविध उपक्रम, जसे नऊ तासांचा सायलेंट रीडाथॉन, नियमित योग व झुंबा सेशन्स, मेंटर-मेंटी प्रोग्राम, मानसशास्त्रीय समुपदेशन, तसेच क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश आहे. ‘आयआयआरएफ’ची ही मान्यता जागतिक दर्जाचे आरोग्यशिक्षण देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. शैक्षणिक उत्कृष्टतेसह प्रत्यक्ष क्लिनिकल अनुभव व सर्वांगीण शिक्षणाचा संगम यामुळे आमचे विद्यार्थी केवळ कुशल व्यावसायिकच नव्हे, तर करुणाशील व समाजाभिमुख नागरिक घडतील, असा विश्वास वाटतो.”
सुषमा संजय चोरडिया म्हणाल्या, “सर्वांगीण विकासाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर ‘सूर्यदत्त’ने कायमच भर दिला आहे. अभ्यासक्रम, क्लिनिकल प्रशिक्षण, मूल्याधिष्ठित शिक्षण, सांस्कृतिक जाण व आरोग्यसाधना यांचा समन्वय साधला जातो. ही राष्ट्रीय मान्यता प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांचे फलित आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग व सशक्त इंडस्ट्री सहयोग यांच्या बळावर ‘सूर्यदत्त’ भावी आरोग्य नेते घडवत आहे. समाजात मूल्य, सहानुभूती व सामाजिक जबाबदारी जोपासणारे सक्षम आरोग्यव्यावसायिक घडविण्यास वचनबद्ध आहे.”