चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ शब्दधन काव्यमंचचा उपक्रम
पिंपरी (दिनांक : २५ ऑगस्ट २०२५) ‘आजवर अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळाले; परंतु निवासस्थानी येऊन शब्दधन काव्यमंचाने केलेल्या सन्मानाने मनात कृतार्थतेचे भाव दाटून आले आहेत!’ असे भावोत्कट उद्गार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार यांनी मित्रमंडळ कॉलनी, पर्वती, पुणे येथे रविवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी काढले. पिंपरी – चिंचवड परिसरातील रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या शब्दधन काव्यमंच या संस्थेमार्फत ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या विशेष उपक्रमांतर्गत
बबन पोतदार यांना ह. भ. प. दत्तात्रयमहाराज दीक्षित यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुंभार, अशोकमहाराज गोरे, मुख्याध्यापक अंबादास रोडे, विजया पोतदार आणि शब्दधनचे अध्यक्ष सुरेश कंक यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
तानाजी एकोंडे यांनी सादर केलेल्या अभंगगायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सुरेश कंक, शामला पंडित, सुभाष दीक्षित, डॉ. मंगेश कश्यप यांनी आपल्या मनोगतातून बबन पोतदार यांच्या ग्रामीण कथाकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:शाल व्याख्याते, पुणे – मुंबई – सांगली आकाशवाणीवरील मान्यताप्राप्त लेखक, साहित्यिकांचे मार्गदर्शक अशा विविध पैलूंचा ऊहापोह केला. नारायण कुंभार यांनी, ‘बबन पोतदार यांचे साहित्यलेखन अक्षरवाड्.मयाच्या पंक्तीत जाऊन बसले आहे!’ असे गौरवोद्गार काढले. विलास पायगुडे आणि विलास कुंभार यांनी कविता सादर केल्या. दत्तात्रयमहाराज दीक्षित यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘पोतदार यांनी अनेक साहित्यिक घडवले आहेत!’ असे मत व्यक्त केले.
डॉ. दीप्ती पोतदार, ऋचा पोतदार, शैलेश लिमये, संजय वेदपाठक, शारदा पानगे, कल्याण पानगे, सचिन सुतार, अनिल शिंदे, माधव वेदपाठक, हर्षल वेदपाठक यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले.