spot_img
spot_img
spot_img

नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत त्रिंबक बिनीवाले प्रथम

पिंपरी (दिनांक : २२ ऑगस्ट २०२५) नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ३२ व्या नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत त्रिंबक बिनीवाले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, सचिव माधुरी ओक, दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव मिलिंद कुलकर्णी, आर. एस. कुमार, पी. के. पाटील, नंदकुमार मुरडे, रमेश वाकनीस, रजनी अहेरराव, यांची प्रमुख उपस्थिती होती. 
काव्यलेखन स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे ११३ कवींपैकी सुमारे ७२ कवींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कवितेचे सादरीकरण केले. त्यामध्ये विजेत्या ठरलेल्या कवींचा तपशील खालीलप्रमाणे :-
त्रिंबक बिनीवाले (प्रथम), वैभव धस (द्वितीय), आय. के. शेख (तृतीय), देवेंद्र गावंडे आणि रेवती जोगदंड (उत्तेजनार्थ) याशिवाय अपंग असूनही व्हीलचेअरवर येऊन स्पर्धेत पूर्णवेळ उपस्थित राहिलेल्या मंगला पाटसकर तसेच आजोबा (अनंत घोगले) आणि नात (युगंधरा घोगले) यांना एकत्रित कविता सादरीकरणासाठी विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
विनाशुल्क असणाऱ्या या स्पर्धेत, विजेत्या कवींना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रशस्तिपत्र  आणि शाल प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर सहभागी सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. ज्येष्ठ कवयित्री जयश्री श्रीखंडे आणि ज्येष्ठ कवी संतोष गाढवे यांनी परीक्षण केले.
सदर कार्यक्रमात भाग्यश्री अत्रे यांना फार्मसीमध्ये पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डाॅ. गिरीश आफळे, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव मिलिंद कुलकर्णी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाभाऊ गावडे यांच्या शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. आफळे म्हणाले की, तरुणांना प्रोत्साहन देणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हा सत्कार या संस्थेच्यावतीने आणि मान्यवर साहित्यिकाच्या साक्षीने होत आहे या गोष्टीचा मला आनंद वाटतो. याप्रसंगी डॉ. अत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या भावना अनावर झाल्या.
त्यांनी आई-वडिलांची कृतज्ञता आणि समाजाचे उपकार याची जाणीव ठेवून आपले विचार मांडले. नवयुगचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी मुख्य कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांगितले की, स्पर्धेची कविता ही पाठ हवी. मोबाइल आणि कागदामुळे सादरीकरणात अडथळा येत असतो. नवयुग ही काव्यस्पर्धा नेहमी नि:पक्षपणे घेत असते त्यामुळेच हे मंडळ ३२ वर्षे कार्यरत आहे. संतोष गाढवे यांनी परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कवींचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ कवी अरुण कांबळे यांनी प्रातिनिधिक कविता सादर केली. अध्यक्षपदावरून बोलताना दादाभाऊ  गावडे यांनी जुन्या काळातील गेय कवितांचे दाखले देत कवींना मार्गदर्शन केले. सलीम शिकलगार, अनिकेत गुहे, नेहा कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. अरविंद वाडकर यांनी काव्यस्पर्धेचे सूत्रसंचालन केले. पी. बी. शिंदे यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!