spot_img
spot_img
spot_img

निगडीतील धोकादायक एस.टी. थांबा तात्काळ बंद करा! अन्यथा आंदोलन ; मनसेचा इशारा!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील निगडी गावठाण परिसरातील कै.मधुकरराव पवळे उड्डाणपुलावर, मारुती मंदिरासमोरील भुयारी मार्गाजवळ एस.टी. महामंडळाच्या बसेस बेदरकार व धोकादायकरीत्या थांबवल्या जातात. येथून प्रवासी धोकादायक पद्धतीने उतरवले जातात व नजीकच असलेल्या उड्डाणपुलाच्या जाळ्या तोडून प्रवासी जीव धोक्यात घालून ये-जा करतात. ही परिस्थिती भविष्यात गंभीर दुर्घटनेला आमंत्रण देणारी असून कोणत्याही क्षणी जीवितहानी होऊ शकते. याकरिता निगडी विभागातील धोकादायक एस.टी. थांबा तात्काळ बंद करून अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा, अन्यथा एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना काळे फासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वतीने देण्यात आला आहे.

यासंदर्भात पुणे विभागीय अधिकारी एस टी महामंडळाचे अध्यक्ष कमलेश धणराळे यांना मनसे वतीने निवेदन देण्यात आले, यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले , योगेशजी लंगोटे , आकाश कांबळे, जय सकट , अनिल चव्हाण, मयुर खरात हे उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक वेळा लेखी निवेदनं देवून पाठपुरावा केला आहे. मात्र एस.टी. महामंडळाकडून आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे, सदर धोकादायक एस.टी. थांबा तात्काळ बंद करून अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावा, अन्यथा एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना काळे फासून निषेध करण्यात येईल, असा इशारा मनसेकडून देण्यात येत आहे.

याच उड्डाणपुलावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी टँकर पलटी झाल्याने मोठा अपघात घडला. याच भागात आधीही झालेल्या अपघातांत अनेकांचे जीव गेलेले आहेत तर काही जणांना आयुष्यभराचे अपंगत्व आलेले आहे. याबाबत रोज नागरिकांच्या, विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांच्या तक्रारी येत आहेत. पूर्वी सर्व एस.टी. बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी भक्ती-शक्ती चौक येथे थांबत असत. मात्र मेट्रो प्रकल्पाच्या चालू असणाऱ्या कामामुळे आता थेट निगडीतील कै.मधुकरराव पवळे उड्डाणपुलाच्या मध्यभागीच एस टी बस थांबा निर्माण करण्यात आला, ही प्रवाशांच्या जिवाशी खेळणारी व अत्यंत बेजबाबदार कृती आहे. म्हणूनच संबंधित अधिकाऱ्यांनी सदरील ठिकाणी तात्काळ पाहणी करून हा धोकादायक एस.टी. थांबा बंद करून सुरक्षित व योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल व एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना काळे फासून जबाबदार धरले जाईल.

विनंतीवजा अंतिम इशारा : या मागणीसंदर्भात मनसेच्या वतीने यापूर्वी तीन वेळा निवेदनं देण्यात आलेली आहेत. हे चौथे व अंतिम निवेदन असून यानंतर कोणताही विलंब झाल्यास थेट कृती करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!