शबनम न्यूज | प्रतिनिधी
जिल्ह्यातील चौदा नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून नगरपरिषदेसाठी येत्या ३१ ऑगस्टपर्यंत तर नगरपंचायतीसाठी २१ ऑगस्टदरम्यान हरकती-सूचना देता येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींनी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार केला आहे. हा आराखडा जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाने त्याची छाननी करून मंचर, माळेगाव आणि वडगाव मावळ या तीन नगरपंचायतींचा प्रारुप आराखडा हा विभागीय आय़ुक्तालयात पाठविला होता.तसेच बारामती, तळेगाव, लोणावळा, चाकण, दौंड, फुरसुंगी, सासवड, जेजुरी, भोर, इंदापूर, जुन्नर, आळंदी, शिरूर आणि राजगुरूनगर या १४ नगरपरिषदांचा प्रारुप आराखडा मान्यतेसाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांकडे पाठविले होते. त्यानंतर पुढील टप्प्यात या दोन्हीचे प्रारूप आराखडे जाहीर करण्यात आले आहेत.
त्यामुळे आता हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. हरकती सूचना प्राप्त झाल्यानंतर नगरपालिकेसाठी एक ते आठ सप्टेंबर दरम्यान आणि नगरपंचायतीसाठी २२ ते आठ सप्टेंबर दरम्यान सुनावणी घेण्यात येणार आहे.