शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुण्याच्या गौरवशाली गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी गेल्या वर्षीपासून ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये झालेल्या ग्लोबल गणेश करंडक २०२५ या जागतिक स्पर्धेत स्पेनच्या बार्सिलोना येथील महाराष्ट्र मंडळ (उत्सव विभाग) व युगांडाच्या बेंजामिन तुमवेसीगये (फोटोग्रा फी विभाग) हे विजेते ठरले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गणेशोत्सव झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते घेण्यात येणार आहे.
उत्सव विभागात जपान येथील योकोहामा मंडळाने द्वितीय, झाम्बिया येथील महाराष्ट्र मंडळ लुसाकाने तृतीय, तर नायजेरियाच्या महाराष्ट्र मंडळ रेसिडेन्स असोसिएशनने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. फोटोग्राफी विभागात जर्मनीतील कार्तिक संघानी यांनी द्वितीय, तर भारतातील पुणेकर असलेल्या आनंद चैनी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेसाठी ऋशिकेष कायत, ऋतुजा नराल, तेजस्विनी गांधी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले होते.
स्पर्धेच्या संयोजनात ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ, स्वागत समिती प्रमुख अमोल जोशी, आंतरराष्ट्रीय समन्वयक धनश्री पाटील, मुख्य समन्वयक अनिरुध्द येवले, डॉ. सतिश देसाई, प्रणव भुरे, चिन्मय वाघ यांनी पुढाकार घेतल्याचे प्रसिद्धीप्रमुख जीवराज चोले यांनी कळवले आहे.