spot_img
spot_img
spot_img

पुणे-लोणावळा लोकल दुपारच्या वेळेत सुरू करणे अशक्य

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लेखी पत्राद्वारे खासदार श्रीरंग बारणे यांना माहिती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच या कालावधीत एकही लोकल गाडी नसल्याने प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांचे हाल होत असून दुपारच्या वेळेत लोकल सुरु करण्याची सातत्याने मागणी करणारे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना केंद्र सरकारने लेखी पत्र दिले आहे. रेल्वे ट्रकच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पुणे ते लोणावळा दरम्यान दुपारी बारा ते तीन या वेळेत लोकल सुरु करणे शक्य  नसल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कळविले आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे की, कोरोना साथ सुरू होण्यापूर्वी पुणे-लोणावळरदरम्यान लोकल गाड्यांचे संचालन व्यवस्थित सुरू होते. कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली. कोरोनानंतर देशात पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे सुरू झाल्या आहेत. कोरोना साथीच्या पूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत दोन लोकल गाड्या चालवल्या जात होत्या. त्या गाड्यांचे संचालन आता बंद आहे.

पुणे-लोणावळा मार्गावर विद्यार्थी, महिला, शेतकरी, नोकरदार, पर्यटक अशा अनेक घटकातील हजारो प्रवासी प्रवास करतात. तळेगाव आणि पिंपरी-चिंचवड मधील औद्योगिक वसाहतींमध्ये दुसर्‍या शिफ्टच्या कर्मचार्‍यांना कामावर येण्यासाठी साडेअकरा ते अडीच वाजताच्या कालावधीत येणार्‍या लोकलचा फायदा होईल. त्यामुळे दुपारच्या वेळेत लोकल सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सभागृहात आवाज उठविला. तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेयांना ७ डिसेंबर २०२३ रोजी पत्र दिले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाही २० मे २०२५ रोजी लेखी पत्राद्वारे मागणी केली. परंतु, सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

 रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ११ ऑगस्ट रोजी खासदार श्रीरंग बारणे यांना लेखी पत्र दिले आहे.  रेल्वे ट्रकच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पुणे ते लोणावळा दरम्यान दुपारी बारा ते तीन या वेळेत लोकल सुरु करणे शक्य  नसल्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी पत्रात म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!