spot_img
spot_img
spot_img

पिंपरी येथे बाराव्या विश्वबंधुता विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

” बंधुता हे वैश्विक मूल्य असून, भारतीय संस्कृतीचे तीर्थक्षेत्र आहे. आज जगभरात जाती-धर्माच्या अस्मिता धारदार होऊन समाजात शत्रुभाव निर्माण होत आहे. अशावेळी आपण बंधुभाव शोधत आहोत. बंधुतेचा विचारच समाजाला एकसंध ठेवू शकणार आहे. त्यामुळे बंधुतेचा विचार मनामनात रुजवण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष व विचारवंत डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी केले.

विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाराव्या विश्वबंधुता विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप झाला. प्रसंगी डॉ. शमशुद्दीन तांबोळी आणि आयुर्वेदतज्ञ डॉ. जयकुमार ताम्हाणे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाध्यक्ष डॉ. अविनाश सांगोलेकर, स्वागताध्यक्ष डॉ. पांडुरंग भोसले, विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या अध्यक्षा प्रा. भारती जाधव आदी उपस्थित होते.

डॉ. शमशुद्दीन तांबोळी म्हणाले, “जाती-धर्माच्या अस्मिता अधिक धारदार होत असल्याने समाज अस्थिर होत आहे. बंधुता, समता ही मूल्य समाज व्यवस्था टिकवून ठेवतात. त्यामुळे या मूल्यांचा प्रसार शालेय वयात झाला पाहिजे. भारतीयत्वाचा अभिमान आणि संविधानाचा सन्मान या तत्वांवर माझी गेली ४५ वर्ष वाटचाल सुरूआहे. समविचारी लोकांना एकत्र आणून बंधुता विचार पेरण्याचे धाडस बंधुता परिषद तथा प्रकाश रोकडे करत आहेत.”  

डॉ. जयकुमार ताम्हाणे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार मिळणे, हे माझे भाग्य समजतो. धार्मिक, जातीय भेद हे येणाऱ्या पिढीसाठी घातक आहे. हा भेदाभेद दुर ठेवण्यासाठी महामानवांची शिकवण, बंधुतेचा विचार आचरणात आणण्याची गरज आहे. समाजात काही घटकांना असलेले असुरक्षित वातावरण बंधुतेचा विचारच मारू शकतो.”

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “सध्याच्या जागतिक परिस्थितीचे नीटपणे अवलोकन केले, तर केवळ सत्ता, संपत्ती आणि शक्ती सामर्थ्याच्या जोरावर जग जिंकणे, महासत्ता किंवा विश्वगुरू बनणे अत्यंत अवघड आहे. हे साध्य करण्यासाठी प्रेम आणि सेवाभाव गरजेचा आहे. हाच संदेश पंचशील तत्त्वातून दिलेला असून, पंचशील तत्त्वज्ञान हे विश्वबंधुत्वाचे सार आहे. तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर, मोहम्मद पैगंबर आणि संतमहात्म्यांचा आपला भारत देश हा विश्वविख्यात आहे, हे विसरून चालणार नाही. या शाश्वत सत्याच्या आम्हा समस्त भारतीयांना अभिमान आहे.”

डाॅ. अविनाश सांगोलेकर यांनी साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते प्रबोधन, जाणीव करून देणारे असते. समाजात पसरलेली असुरक्षिततेची भावना कमी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील रहावे. धर्माधिष्ठित राष्ट्र निर्मितीची भावना घातक आहे. अशावेळी देशाला गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या विचारांची गरज आहे. तरुण पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळे शिक्षकांनी हे मौल्यवान विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला हवेत.”

उद्योजक बाळासाहेब वाघेरे यांना महात्मा फुले समाजसेवक पुरस्कार, तर शिवव्याख्यात्या सुलभा सत्तूरवार यांना विश्वबंधुता लोकशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन प्रा. डाॅ. सुहास निंबाळकर, डाॅ. मारूती केकाणे, प्रा. डाॅ. दत्तात्रय हिंगणे, प्रा. भाऊसाहेब सांगळे, डाॅ. निळकंठ डहाळे, डाॅ. शुभदा लोंढे, संतोष गायकवाड, प्रा. तेजस्वीनी पाटील, प्रा. देवकी राठोड, संध्याराणी जयहिंद कोल्हे, आरती जगताप, प्रा. बी. एस. पाटील, सखाराम सिंगाडे यांना सन्मानित करण्यात आले.

डॉ. पांडुरंग भोसले यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्रा. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. संगीता अहिवळे यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!